पुणे : डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. पुण्यात यंदा डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर डास निर्मूलनाचे पारंपरिक उपाय अपुरे पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुण्यातील संशोधकाने ड्रोनच्या साहाय्याने डास शोधून त्यांचे निर्मूलन करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञाधारित (एआय) ‘स्मार्ट सर्व्हिलन्स’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचा वापर महापालिकेने करावा, यासाठी त्याने प्रस्तावही सादर केला आहे.

डॉ. केदार देवभानकर असे या संशोधकाचे नाव आहे. ते रॉस लाइफसायन्सेस लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी कृत्रिम प्रज्ञाधारित ‘स्मार्ट सर्व्हिलन्स’ तंत्रज्ञानाचा प्रस्ताव महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर मांडला आहे. आरोग्य विभागाने पथदर्शी प्रयोग म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर ठरावीक भागात करावा, असा त्यांचा प्रस्ताव आहे. यासाठी येरवडा-कळस-धानोरी, ढोले पाटील रस्ता आणि घोले रस्ता या तीन क्षेत्रीय कार्यालयांची नावे सुचविण्यात आली आहेत. कारण या क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात झोपडपट्टी परिसर आणि खुले नाले अधिक आहेत. त्यामुळे तिथे डासांचा प्रादुर्भाव अधिक असून, पर्यायाने कीटकजन्य आजारांचा प्रसारही जास्त आहे. पुण्यात डासांचा जास्त प्रादुर्भाव असलेला १० चौरस किलोमीटर भागातील एक विभाग पथदर्शी प्रकल्पासाठी निवडला जाईल. त्यानंतर तिथे स्मार्ट सर्व्हिलन्स सुरू होईल. त्यात ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने साचलेल्या पाण्याचे साठे शोधले जातील. त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या भागातील डासांचा शोध घेतला जाईल. डास सापडल्यानंतर हे ड्रोन तिथे कीटकनाशकांची फवारणी करतील. त्यात रासायनिकऐवजी जैविक कीटकनाशकांचा वापर केला जाईल. हे फवारणीचे चक्र दर १५ दिवसांनी तीन महिन्यांसाठी सुरू राहील, अशी माहिती डॉ. देवभानकर यांनी दिली.

डास निर्मूलनासाठी स्मार्ट सर्व्हिलन्स यंत्रणेचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. सध्या निधीची तरतूद नसल्याने संबंधित कंपनीनेच पथदर्शी प्रकल्प करावा, असे पत्र त्यांना देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे प्रभावीपणे डास निर्मूलन झाल्यास त्याची अंमलबजावणी संपूर्ण महापालिका क्षेत्रात केली जाईल.- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका

ड्रोन कॅमेऱ्यात कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने डास नेमक्या कोणत्या प्रजातीचे आहेत, हे कळू शकणार आहे. त्यातूुन त्या भागात कोणत्या रोगांचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, याचाही अंदाज बांधला जाऊ शकेल. आम्ही आमच्या प्रयोगशाळेत याच्या चाचण्या घेतल्या आहेत. महापालिकेने आम्हाला पथदर्शी प्रकल्प राबविण्यास मंजुरी दिली आहे.- डॉ. केदार देवभानकर, व्यवस्थापकीय संचालक, रॉस लाइफसायन्सेस लिमिटेड

स्मार्ट सर्व्हिलन्स यंत्रणा

– ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने डासोत्पत्ती स्थानांचा शोध

– ड्रोन कॅमेऱ्यात एआयच्या वापरामुळे डासांच्या प्रजातीची माहिती

– ड्रोनच्या मदतीने डासोत्पत्ती स्थानांवर जैविक कीटकनाशक फवारणी

– कृत्रिम प्रज्ञेच्या साहाय्याने वर्तमान रुग्णसंख्येचे जलद विश्लेषण

– कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती

– सहा महिन्यांत कीटकजन्य आजारांमध्ये ७५ ते ८० टक्के घट शक्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– महापालिकेच्या आरोग्य सेवांवरील ताण कमी होण्यास मदत