‘जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा, हरे राम हरे कृष्णा…’ च्या जयघोषात पुणेकरांनी भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा यांच्या प्रतिमा विराजमान असलेल्या जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचे रविवारी उत्साहात स्वागत केले. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेचे ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आले.
ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा यंदा आषाढ महिन्यात मोठया उत्साहात साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इस्कॅान, पुणे यांच्यातर्फे लोकनाथ स्वामी महाराज, भक्ती पुरुषोत्तम स्वामी महाराज आणि कृष्णचैतन्य स्वामी महाराज यांच्या हस्ते पूजन करून जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला सुरुवात झाली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, इस्कॉन पुणेचे अध्यक्ष राधेश्याम दास, माधव जगताप, प्रशांत वाघमारे, माजी खासदार अमर साबळे, श्रीनाथ भिमाले, कृष्णकुमार गोयल, जयप्रकाश गोयल, इस्कॉन पुणेचे श्वेतद्वीप दास, नटवर दास, रेवतिपती दास हे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी सजावट करण्यात आलेल्या रथावर देवतांच्या मूर्तीला कलकत्ता येथून आणलेल्या वस्त्राचा पोशाख तसेच सुवर्णालंकार घालण्यात आले होते. श्री हनुमानाच्या वेशातील कलाकारासह झेंबे, कर्ताल, मृदंग अशी वाद्ये वाजवित भाविक यात्रेत सहभागी झाले. शंखनाद व ढोल-ताशांचा गजर तसेच पुष्पवृष्टी पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविकांनी ओढला. जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर मार्गे हॉटेल सेंट्रल पार्क येथे रथयात्रेचा समारोप झाला.
रथयात्रेच्या समारोप प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संपूर्ण रथयात्रेदरम्यान तब्बल ६० हजार भाविकांना महाप्रसादाच्या पाकिटांचे वाटप आणि दहा हजार भक्तींना भोजन देण्यात आले.