पुणे : धनकवडी परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार ज्येष्ठ महिला धनकवडी भागात राहायला आहेत. त्या शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास धनकवडीतील हिल टाॅप सोसायटी परिसरातून निघाल्या होत्या. धनकवडी ते तळजाई रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.
कोथरूड, पाषाण परिसरात तीन दिवसांपूर्वी सकाळी फिरायला निघालेल्या महिलांसह, एका ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते. शहरात महिलांकडील दागिने हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
लष्कर भागात मोबाइल हिसकावला
लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसरात एकाच्या हातातील मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. याबाबत एकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास साचापीर स्ट्रीट परिसरातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक मोकाटे तपास करत आहेत.
ज्येष्ठाला धमकावून लुटले
लष्कर भागात ज्येष्ठ नागरिकाला धमकावून, तसेच त्याला धक्काबुक्की करून चोरट्यांनी त्याच्याकडील पाकीट हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वानवडी भागात राहायला आहेत. ते १० मे रोजी सरबतवाला चौक परिसरातून निघाले होते. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्यांच्या पाया पडण्याचा बहाणा केला. तेव्हा ज्येष्ठाने त्यांना विरोध केला. चोरट्यांनी झटापट करून त्यांच्या खिशातील पाकीट काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.