पुणे : सासवड परिसरातील कोडित गावात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी दहा किलो ५०० ग्रॅम वजनाची अफूची बोंडे जप्त करण्यात आली.

याप्रकरणी दशरथ सीताराम बडदे (वय ६५), तानाजी निवृत्ती बडदे (वय ६९, रा. कोडित, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दहा किलो ५०० ग्रॅम वजनाची अफूची बोंडे जप्त करण्यात आली असून, जप्त केलेल्या अफूच्या बोंडाची किंमत २१ हजार रुपये आहे. पुरंदर तालुक्यातील कोडित गावात कांदा शेतीत बडदे यांनी अफूची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली.

हेही वाचा…पुणे :‘मेफेड्रोन’ प्रकरणात पश्चिम बंगालमधून एकजण ताब्यात

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेव्हा अफूची लागवड न दिसण्यासाठी बडदे यांनी कांदा आणि शेवंतीच्या फुलांची लागवड केल्याचे आढळून आले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक राहुल गावडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, दगडू वीरकर, सूरज नांगरे यांनी ही कारवाई केली. बडदे यांना सासवड न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पुणे जिल्ह्यातील बेकायदा धंदे, अमली पदार्थ विक्री, तस्करांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत – पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस

हेही वाचा…पुण्यात ‘एम्स’ उभे राहणार! अजित पवारांची मोठी घोषणा

ग्रामीण भागात अफूची छुपी लागवड

गेल्या वर्षी ग्रामीण पोलिसांनी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी अफूची लागवड दिसू नये म्हणून मक्याची लागवड केली होती. सासवड परिसरातील कोडित परिसरात मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. अफूची लागवड न दिसण्यासाठी आरोपींनी कांदा आणि शेवंतीची लागवड केली होती.