पुणे : शिरूर तालुक्यातील कवठे यमाई परिसरात दूध वाहतूक करणारा टँकर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघे जण अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील वडनेगर गावचे रहिवासी आहेत.
ज्ञानेश्वर मकाजी वाजे (वय ३८), त्यांची आई शांताबाई (वय ६८), मुलगा युवांश (वय ५) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजे कुटुंबीय हे मूळचे पारनेर तालुक्यातील वडनेर गावचे आहे. रविवारी पहाटे ज्ञानेश्वर, त्यांची आई शांताबाई, मुलगा युवांश हे दूध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गावाकडे निघाले होते. शिरूर तालुक्यातील कवठे यमाई परिसरात दूध वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर टँकर आदळला. धडक एवढी जोरात होती की, टँकर आणि ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला.
अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर, त्यांची आई शांताबाई, मुलगा युवांश यांना टँकरमधून बाहेर काढण्यात आले. अपघातात टँकरचालक जखमी झाला. चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच युवांश याचा मृत्यू झाला होता. उपचारांदरम्यान ज्ञानेश्वर आणि त्यांची आई शांताबाई यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शिरुर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या प्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.