उरूळी देवाची येथील कचरा भूमीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार असून छतावर १०० किलो वॅाट ऊर्जानिर्मिती करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या माध्यमातून निर्माण होणारी वीज पथदिवे आणि अन्य कामांसाठी वापरली जाणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ५५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशानुसार महापालिकेकडून ही कार्यवाही करण्यात येणार आहे.

उरूळी देवाची येथील कचरा भूमीसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिरणात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीवेळी महापालिकेला दोन कोटी रुपयांचे हमीपत्र आणि कचरा भूमी परिसरात पर्यावरणपूरक कामे करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले होते.

५५ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया महापालिकेकडून राबिवण्यात येणार –

न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार कचऱ्यापासून निर्माण होणारे लिचेट वाहून नेण्यासाठी गटारे महापालिकेने बांधली आहेत. तसेच कचरा भूमीच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले आहे. यापुढील टप्प्यात कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या छतांवर सौर ऊर्जा निर्माण करण्याचे नियोजनआहे. त्यासाठी ५५ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया महापालिकेकडून राबिवण्यात येणार आहे. पथदिवे, वजनकाटा, पंप हाऊसच्या मोटारी, सीसीटीव्ही यंत्रणेसाठी या विजेचा वापर केला जाईल. अतिरिक्त वीज निर्मिती झाल्यास वीज विक्री करण्याचेही विचाराधीन आहे. त्यातून महापालिकेला काही प्रमाणात उत्पन्न मिळेल आणि कचरा भूमीतील प्रक्रिया प्रकल्पांसाठी लागणाऱ्या विजेचा खर्चही कमी होईल, असा दावा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थान विभागाकडून करण्यात आला आहे.