पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) सोलू ते निरगुडी-वडगाव शिंदे या दरम्यानचा पाच किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. परिणामी पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस-वे) ते नगर रस्ता या दरम्यानचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन – एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्ता वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>दिवाळीच्या तोंडावर सर्वसामन्यांना दूसरा झटका; अमूलनंतर गोकुळने वाढवले दूधाचे दर

प्रादेशिक विकास आराखड्यातील वर्तुळाकार रस्ता विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच पीएमआरडीएने घेतला आहे. एकूण १२८ किलोमीटर लांबीचा हा रस्ता होता. मात्र, एमएसआरडीसी आणि पीएमआरडीए या दोन्हीचे वर्तुळाकार रस्ते काही भागांत एकाच गावातून जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पीएमआरडीएच्या वर्तुळाकार रस्त्याची लांबी चाळीस मीटरने कमी करून ८१ किलोमीटर लांबीचा रस्ता करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत समितीमध्ये घेण्यात आला होता. तसेच वर्तुळाकार रस्त्याची रूंदी कमी करून तो ६५ मीटरचा करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला. त्यासाठी रुंदी कमी करण्यात आलेल्या रस्त्याचा पुन्हा एकदा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी पीएमआरडीएकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार मुंबई येथील एका सल्लागार कंपनीला हे काम देण्यात आले आहे. त्यामध्ये प्राधान्याने सेलू ते निरगुडी-वडगाव शिंदे दरम्यानच्या पाच किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार रस्त्याचे सर्वेक्षण प्राधान्यक्रमाने पूर्ण करून द्यावे. उर्वरित रस्त्याचे सर्वेक्षणाचे काम त्यानंतर पूर्ण करावे, असा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे.

हेही वाचा >>>पुणे : अधिवेशन अध्यक्षपदी महेंद्र गणपुले यांची निवड

दरम्यान, या कंपनीकडून पाच किलोमीटरच्या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ देखील रस्त्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. जेणेकरून वर्तुळाकार रस्त्याचे काम वेळेत मार्गी लागण्यास मदत होणार आहे. एमएसआरडीसीकडून पश्चिम भागातील वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से पथकर नाक्यापासून हा वर्तुळाकार रस्ता सुरू होणार आहे. तो नगर रस्त्याला वाघोली जवळ येऊन जोडणार आहे. त्यापैकी द्रुतगती महामार्ग ते सोलू या दरम्यान ३८ किलोमीटरचे काम हे एमएसआरडीसी करणार आहे, तर सोलू ते निरगुडी- वडगाव शिंदे दरम्यान पाच किलोमीटरचे काम हे पीएमआरडीए करणार आहे. तसेच वडगाव शिंदे ते वाघोली दरम्यानचे काम हे पुणे महापालिका करणार आहे.

हेही वाचा >>>लोकजागर : वाहून गेलेले शहर

वर्तळाकार रस्त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढून कंपनी नेमण्यात आली आहे. या कंपनीला सोलू ते निरगुडी-वडगाव शिंदे दरम्यान ४.८० किलोमीटर लांबीचे सर्वेक्षण प्राधान्याने पूर्ण करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर हे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे, असे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहूल महिवाल यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune the circular road will be completed dynamically pune print news amy
First published on: 19-10-2022 at 13:15 IST