पुणे: दहीहंडीनिमित्त शनिवारी मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मोेठे बदल करण्यात येणार आहेत. शनिवारी दुपारी चारनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
दहीहडीनिमित्त मध्यभगाात मोठी गर्दी होते. रात्री दहाच्या सुमारास मध्यभागातील विविध मंडळांच्या दहहंडी फुटतात. छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिससरात हाेणारी गर्दी विचारात घेऊन शनिवारी दुपारी चारनंतर या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वाळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
छत्रपती शिवाजी ररस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे चौक) जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजी बाबा चौक, टिळक चौकातून शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जावे. पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह चौक, खंडोजी बाबा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्त्याने-झाशीची राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. बुधवार चौकाकडून (हुतात्मा चौकाकडे ) आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रस्त्याने सोडण्यात येणार आहे. सरळ पुढे मंडईतील रामेश्वर चौक ते शनिपार चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौक ते सेवासदन चौक दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छितस्थळी जावे.
छत्रपती शिवाजी रस्त्यावरून जिजामाता चौकातून गणेश रस्त्याने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहने गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक, पवळे चौक जुनी साततोटी पोलिस चौकीमार्गे इच्छितस्थळी जातील. गणेश रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच देवजीबाबा चौक ते फडके हौद चौक रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी अपोलो चित्रपटगृह, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दूधभट्टी या रस्त्याचा वापर करावा. सोन्यामारूती चौकातून मोती चौक आणि फडके हौद चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
साडेतीन हजार पोलिसांचा कडक बंदाेबस्त
दहीहंडीनिमित्त मध्यभागासह उपनगरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. १० पोलीस उपायुक्त, १६ सहायक पोलीस आयुक्त, ८० पोलीस निरीक्षक, ३५० उपनिरीक्षक आणि साडेतीन हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तास तैनात करण्यात येणार आहे.