पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परदेशी विद्यापीठासह प्रथमच अकादमीची स्थापना केली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठासह सामंजस्य कराराअंतर्गत ‘यूओएम-एसपीपीयू अॅकॅडमी’ची स्थापना करण्यात आली असून, या अंतर्गत नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासह संशोधन, प्रशिक्षणाचे उपक्रम राबवले जातील.
गेल्यावर्षीच या अकादमीची स्थापना करण्यात आली होती. मात्र करोना प्रादुर्भावामुळे त्याचे प्रत्यक्ष उद्घाटन होऊ शकले नव्हते. बुधवारी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षरी आणि अकादमीचे उद्घाटन करण्यात आले. नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षण संस्थांना मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात मेलबर्न विद्यापीठाच्या साहाय्याने सामाजिक शास्त्र, शिक्षणशास्त्र, डिझाईन िथकिंग अशा विषयात अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी सांगितले. भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणात नवसंकल्पनांवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षणात अधिकाधिक नावीन्य, प्रयोगशीलता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही अभ्यासक्रम मेलबर्न विद्यापीठात सुरू करता येऊ शकतात. मेलबर्न विद्यापीठात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते, असे वेसले यांनी नमूद केले.
महत्त्व काय?
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठाने परदेशी विद्यापीठासह पहिल्यांदाच अकादमीची स्थापना केली आहे. मेलबर्न विद्यापीठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ब्लेंडेड बीएस्सी हा अभ्यासक्रम चालवला जातो. आता ‘डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड’ आणि ‘बॅचलर ऑफ एज्युकेशन’ हे दोन अभ्यासक्रम सुरू केले जातील.
दुहेरी पदवी अभ्यासक्रम प्रस्तावित
येत्या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह दुहेरी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) दुहेरी पदवीबाबतचे धोरण निश्चित करण्यात आल्यावर हा अभ्यासक्रम सुरू केला जाईल. त्या अंतर्गत ऑस्ट्रेलियातील विद्यार्थीही पुण्यात शिकायला येऊ शकतील,
असे प्रा. मुथुपंडियन अशोककुमार यांनी सांगितले.