पुणे विद्यापीठाच्या सुरक्षेचा विषय अनेकवेळा गाजूनही विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसत आहे. पुणे विद्यापीठाच्या ४११ एकर परिसराच्या सुरक्षेसाठी एकावेळी साधारण ४० सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सुरक्षा ऑडिटच्या अहवालावरही विद्यापीठाकडून अजून कार्यवाही झालेली नाही.
पुणे विद्यापीठात होणाऱ्या चोऱ्या, चंदनाच्या झाडांची चोरी, खून, मुलींची छेडछाड अशा घडलेल्या घटना यांमुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातच पुणे विद्यापीठामध्ये असणारा परदेशी विद्यार्थ्यांचा वावर यांमुळे विद्यापीठाला धोका असल्याची सूचनाही विद्यापीठाला देण्यात आली. या पाश्र्वभूमीवर चतु:शृंगी पोलीस, विशेष शाखा, गुप्तवार्ता विभाग यांनी डिसेंबर २०१३ मध्ये विद्यापीठाच्या परिसराचे ‘सुरक्षा ऑडिट’ केले. त्या वेळी विद्यापीठाच्या सुरक्षिततेत अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले. सुरक्षिततेबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील, या बाबत या पथकाने विद्यापीठाचा परिसर पाहून त्यांच्या अहवालात सूचनाही केल्या आहेत. या ऑडिटचा अहवाल विद्यापीठाला जानेवारी महिन्यात देण्यात आला. मात्र, तीन महिने झाले तरी विद्यापीठाने या अहवालावर कार्यवाही सुरू केलेली नाही.
विद्यापीठाचा परिसर तब्बल चारशे अकरा एकर आहे. यामध्ये अनेक प्रशासकीय विभाग, शैक्षणिक विभाग, ऐतिहासिक वारसा असलेली मुख्य इमारत, विद्यार्थी वसतिगृहे, रहिवासी चाळी, कर्मचारी निवासस्थाने, आयुका सारखे विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहे असे अनेक विभाग आहेत. यातील बहुतेक विभागांच्या इमारती स्वतंत्र आहेत. त्याचप्रमाणे त्यातील अंतरही जास्त आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाला सध्या साधारणपणे दोनशे सुरक्षा रक्षकांची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, विद्यापीठात सध्या एकावेळी फक्त ३५ ते ४० सुरक्षा रक्षक कार्यरत असतात. यामध्येही सशस्त्र सुरक्षा रक्षकांची संख्या अगदीच नगण्य आहे. सध्या विद्यापीठातील एकूण सुरक्षा रक्षकांची संख्या ही साधारण शंभर ते एकशे वीस आहे.
विद्यापीठात सध्या ‘मेस्को’, ‘ब्रिस्क’ या दोन सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या संस्था आणि विद्यापीठाच्या सुरक्षा विभागातील कर्मचारी यांच्यावर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या संस्थेबरोबर असलेले विद्यापीठाचे कंत्राट संपले आहे. मात्र, अजूनही नवी संस्था नेमण्यात आलेली नाही. विद्यापीठाच्या सुरक्षा ऑडिटबाबत विद्यापीठाच्या अधिसभेतही चर्चा झाली होती. सुरक्षेबाबत तत्काळ उपाय योजण्याचे आश्वासनही विद्यापीठ प्रशासनाकडून अधिसभेला देण्यात आले होते. मात्र, अजूनही विद्यापीठ असुरक्षित असल्याचेच दिसत आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा ऑडिटमध्ये करण्यात आलेल्या काही सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागणार आहे. मात्र, काही उपाय हे तत्काळ करणेही शक्य आहे. विद्यापीठाच्या संरक्षक भिंतीची उंची वाढविणे आवश्यक आहे. तुटलेल्या भिंती दुरूस्त करणे, सुरक्षा भिंतीवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापणे, विद्यापीठात येण्याच्या आणि जाण्याच्या मार्गावर सुरक्षारक्षक  नेमणे. त्याचबरोबर विद्यापीठ परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करणे, सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्कॅनर, फिंगरप्रिंट स्कॅनर अशा अत्याधुनिक व्यवस्था करणे अशा सूचना सुरक्षा ऑडिटमध्ये करण्यात आल्या आहेत. मात्र, यामधील सहज करण्यात येणारे उपायही विद्यापीठ प्रशासनाने अजून केलेले नाहीत.