पिंपरी चिंचवड: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यापूर्वी बावधन पोलिसांनी या प्रकरणामध्ये शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे यांना बेड्या ठोकल्या आहेत. अद्यापही सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार आहेत. या प्रकरणामध्ये बावधन पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
शुक्रवारी राहत्या घरी वैष्णवी शशांक हागवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर एकच खळबळ उडाली. वैष्णवी यांना सासरच्या मंडळीकडून मानसिक आणि शारीरिक जाच होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हुंड्यामुळे हा छळ केला असल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा घरामध्ये आजीसासू, कामवाली, घर गड्याची मुलगी होती, हे पोलीस तपासात समोर आल आहे.
या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही तपासण्यात आले असून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. दरम्यान, वैष्णवी शशांक हगवणे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. अहवालात हत्या आणि आत्महत्या दोन्ही घटना घडू शकतात. असा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस पारदर्शक तपास करत असल्याचं बावधन पोलिसांनी सांगितल आहे. अद्याप ही बावधन पोलिसांच्या हाती राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे लागले नाहीत. दोन्ही वडील आणि मुलाचा शोध पोलीस घेत आहेत. ते निर्दोष असतील तर ते फरार का? आहेत. असा ही प्रश्न विचारला जात आहे.