कोंढव्यातील दुर्घटनेबाबत चौकशी समिती; रहिवाशांच्या मागणीकडे विकासकाचे दुर्लक्ष
कोंढव्यातील अॅल्कॉन स्टायलस सोसायटीतील पार्किंगची जागा खचली होती. याबाबत सोसायटीतील रहिवाशांनी चार महिन्यांपूर्वी विकासकाकडे तक्रार केली होती. अल्कोन स्टायलस सोसायटीच्या पाठीमागील बाजूस असलेली सीमाभिंत खचलेली असून ती कोसळून गंभीर स्वरुपाची दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी तक्रार रहिवाशांनी केली होती.
विकासकाने केलेल्या दुर्लक्षामुळे शेजारील नियोजित गृहप्रकल्पावर काम करणाऱ्या १५ बांधकाम मजुरांचा हकनाक बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया अल्कोन स्टायलस सोसायटीतील रहिवाशांनी शनिवारी व्यक्त केली. या प्रकरणी विकासकाला ई-मेल करण्यात आलेली तक्रारींची कागदपत्रे रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे दिली.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुरांच्या कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले तसेच अॅल्कॉन स्टायलस सोसायटीतील नागरिकांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना राव म्हणाले, सीमाभिंत कोसळणे तसेच दुर्घटनेमागचे कारण शोधण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात महापालिकेचे अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांचा समावेश आहे. या प्रकरणी आठवडाभरात अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कारवाई सुरू करण्यात येईल.
कोंढवा भागातील दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली तेव्हा मजुरांना राहण्यासाठी करण्यात आलेल्या जागेची व्यवस्था सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामाविषयी सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसान भरपाई
दुर्घटनेत बळी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.