पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील नागरी समस्यांच्या मालिकेत आता आणखी भर पडली आहे. आयटी पार्क परिसरातील रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. यामुळे आयटी पार्कचे रूपांतर ‘खड्डे पार्क’मध्ये झाले आहे. हेच आयटी पार्क मे महिन्यात ‘वॉटर पार्क’ बनले होते आणि वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याने ते नेहमीच ‘ट्राफिक पार्क’मध्ये रूपांतरित होत असते. या सर्व परिस्थितीमुळे नेमके आयटी पार्क कोणते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीसह नागरी समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शासकीय यंत्रणांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह पर्यायी रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. मात्र, आता संततधार पावसामुळे आयटी पार्कमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. विशेषतः वाहनांची जास्त रहदारी असलेल्या लक्ष्मी चौकात ही समस्या अधिक आहे. यामुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या खड्ड्यांमधून मार्ग काढण्याचे दिव्य आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांना रोज करावे लागत आहे. यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

विकासकांकडून खोडा

एक बाजूला शासकीय यंत्रणांकडून कामे सुरू असताना विकासकांकडून यात खोडा घालण्याचे काम सुरू आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरात घरांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे या परिसरात गृहनिर्माण प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या प्रकल्पांच्या ठिकाणी बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर राडारोडा पसरत आहेत. सध्या पाऊस सुरू असल्याने या राडारोड्याने रस्ते चिखलमय झाले आहेत.

टप्पा तीनमध्ये सर्वाधिक समस्या

हिंजवडीतील मेगापोलीस रेसिडंट्स या रहिवासी संघटनेने या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. या संघटनेने म्हटले आहे की, आयटी पार्क टप्पा तीनमधील रस्ते चिखलमय आणि निसरडे झाले आहेत. काही विकासकांच्या अवजड वाहनांमुळे हे घडत आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी तक्रार केल्यानंतर विकासकाने केवळ त्याच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता पाण्याने धुतला होता. मात्र, पवार पब्लिक स्कूल ते मेगापोलीस सर्कल हा रस्ता तसाच चिखलमय ठेवला होता. आयटी पार्कमधील रस्ते आता रस्ते डांबराचे की चिखलाचे हेच कळत नसल्याचे चित्र आहे.

हिंजवडी आयटी पार्क नेमके वॉटर पार्क, खड्डे पार्क, की ट्राफिक पार्क हेच आता कळेनासे झाले आहे. आपल्या शासकीय यंत्रणांकडून नेमके काय काम सुरू आहे? गेल्या दोन महिन्यांपासून आयटी कर्मचारी आयटी पार्कमधील नागरी समस्या सुधारण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. एवढे करूनही अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. – फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज