कोणत्याही समाजोपयोगी उपक्रमामध्ये पुणेकर नेहमीच आघाडीवर राहिले असल्याचा इतिहास आहे. त्याची प्रचिती महावितरणच्या एलईडी दिव्यांच्या सवलतीच्या दरातील विक्रीच्या उपक्रमातही आली. वीज बचतीच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या योजनेनुसार सुरू असलेल्या एलईडी दिव्यांच्या खरेदीला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुणे व ग्रामीण भागातील नागरिकांनी केवळ पंचेचाळीस दिवसात अकरा लाखांहून अधिक एलईडी दिव्यांची खरेदी करून राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे.
केंद्र शासन पुरस्कृत डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्राम (डीईएलपी) अंतर्गत एनर्जी एफिशियंसी सव्‍‌र्हीसेस लिमिटेड या कंपनीच्या वतीने महावितरण कंपनीच्या घरगुती ग्राहकांना प्रत्येकी दहा दिवे देण्याची येजना पुणे विभागामध्ये दीड महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये प्रत्येक ग्राहकाला सवलतीच्या किमतीमध्ये दहा एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात येत आहे. विजेच्या बचतीसाठी उपयुक्त असणाऱ्या या दिव्यांची किंमत बाजारात साडेतीनशे ते चारशे रुपये आहे. मात्र, या योजनेमध्ये नागरिकांना केवळ शंभर रुपयाला एक दिवा देण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे.
राज्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये एलईडी दिव्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. इतर विभागांच्या तुलनेत पुण्यात ही योजना काहीशी उशिराने आली. पुण्यात योजना सुरू झाली त्या वेळी राज्यात नागपूर विभागामध्ये सर्वाधिक दिव्यांची खरेदी झाली होती. मात्र, पुण्याने अल्पावधीतच नागपूरची बरोबरी करून दिव्यांच्या खरेदीत आघाडी घेतली. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या दिवशी दहा लाख ३१ हजार दिव्यांची खरेदी करीत राज्यात अव्वल स्थान मिळविले. बुधवारी हा आकडा अकरा लाखांच्या आसपास पोहोचला होता. पुणे शहर व ग्रामीण विभागाचा विचार केल्यास ११ लाखांच्याही पुढे दिव्यांची खरेदी झाल्याचे दिसून येते.
योजनेमध्ये प्रत्येक घरगुती वीजग्राहकाला सात व्ॉटचे एलईडी दिवे देण्यात येत आहेत. १० दिवे रोखीने एकाच वेळी किंवा जास्तीत जास्त चार दिवे प्रत्येकी दहा रुपये आगाऊ रक्कम भरून खरेदी करता येतात. या दिव्यांची उर्वरित रक्कम १० हप्त्यांमधून वीजबिलांच्या माध्यमातून भरण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दे दिवे तीन वर्षांच्या कालावधीत खराब झाल्यास बदलून दिले जातात. या दिव्याची किंमत शंभर रुपयेच आहे. त्या पेक्षा जास्त रक्कम देऊ नये. त्याचप्रमाणे दिव्यांच्या खरेदीची पावती घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयासह ठराविक वीजबिल भरणा केंद्रांवर ५५ ठिकाणी, तर िपपरी-चिंचवडमध्ये नऊ ठिकाणी सध्या दिव्यांचे वितरण होणार आहे. शहरात एक कोटी दिव्यांच्या वितरणाचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे.
योजनेअंतर्गत एलईडी दिव्यांची विक्री
देश-   ३ कोटी ८५ लाख
राज्य- ७० लाख, ७२ हजार
पुणे-   ११ लाख १० हजार
मुंबई-  ३ लाख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purchase led lights shopping
First published on: 17-12-2015 at 03:40 IST