आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या (इंटरनॅशनल कौन्सिल फॉर वूमन-आयसीडब्ल्यू) उपाध्यक्षपदी पुण्यातील पुष्पा हेगडे यांची निवड झाली आहे. हेगडे या सर्वाधिक मतांसह संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या व्यक्ती आहेत. गेल्या २५ वर्षांपासून संघटनेत कार्यरत असून यापूर्वी त्यांनी सल्लागार, समन्वयक, एशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

आयसीडब्ल्यू ही १३० वर्षे जुनी संघटना असून, ती ६७ देशांशी संलग्न आहे. संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे असून, आरोग्य, जनकल्याण, शांतता, समानता, शिक्षण, पर्यावरण, स्थलांतर, हिंसाचार, भेदभाव, तस्करी, गरिबी, महिला, मुले, निर्वासित आणि अल्पसंख्याक नागरिकांचे अधिकार या मुद्द्यांवर ही संघटना संयुक्त राष्ट्रसंघासमवेत काम करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपाध्यक्षा म्हणून पुष्पा हेगडे यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. महिला आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण, शिक्षण यासाठी काम करणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्या पारिजात फाउंडेशन, महिला सेवा मंडळ आणि नॅशनल कौन्सिल फॉर वुमन इन इंडियाच्या विश्वस्त म्हणून काम करत असून पूना वुमन कौन्सिल स्कूल बोर्डाच्या त्या अध्यक्षा आहेत.