राफेल खरेदी प्रकरणाची फाईल चोरीला गेल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. मोदी सरकारकडून राफेल खरेदीतला घोटाळा झाकण्यासाठी फाईल जाळली गेली असेल अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संवाद यात्रा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, सिनेअभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुलवामा घटनेवरून सत्ताधारी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर राजकारण केले जाते आहे. त्यानंतर पाकिस्तानला जशाच तसे उत्तर वायुसेनेकडून एअर स्ट्राईकव्दारे देण्यात आले. या वायुसेनेचे अभिनंदन करण्याऐवजी या एअर स्ट्राईकचे श्रेयही भाजपाने लाटले अशीही टीका अजित पवार यांनी केली. किती दहशतवादी मारले गेले? याची आकडेवारी सांगण्याचा अधिकार वायुसेनेला असताना, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे २५० दहशतवादी मारले गेले हे जाहीरपणे सांगत आहेत. त्यांना आकडेवारी जाहीर करण्याचा अधिकार आहे का? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

पुलवामा येथे सैन्य दलाच्या ताफ्यात ती गाडी गेली कशी आणि आपली गुप्तचर यंत्रणा काय करीत होती. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  देशात मनुवादी विचार आणण्याचे आणि पसरवण्याचे काम केले जात आहे. तसेच अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला गोळ्या झाडण्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व गोष्टीचे काही जण समर्थन करताना दिसतात. यामुळे देश अडचणींमध्ये आला आहे. अशा शक्तींविरोधात सर्व समाजाने एकत्रित अशांना बाजूला ठेवण्याचे काम केले पाहिजे. अशा शब्दात भाजपवर त्यांनी निशाणा साधला. आता भाजपाकडून या टीकेला उत्तर दिले जाणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafle file may burn by modi government says ajit pawar in his hadapsar speech
First published on: 06-03-2019 at 22:05 IST