पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून लोहमार्ग दुहेरीकरण आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी पुणे ते सातारा मार्गावर जरंडेश्वर ते सातारा या स्थानकांदरम्यान ३१ मार्चला ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मेगाब्लॉकमुळे ३० मार्चला सुटणाऱ्या कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-सातारा डेमू, पुणे-सातारा डेमू, कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर ३१ मार्चला सातारा-कोल्हापूर डेमू, कोल्हापूर-सातारा डेमू, कोल्हापूर-पुणे डेमू, पुणे-कोल्हापूर डेमू, पुणे -कोल्हापूर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – मी उमेदवार आहे माझ्याशी भिडा; वडिलांवर कसली टीका करता ? प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना आव्हान

दादरहून सुटणारी दादर-सातारा एक्स्प्रेस २९ मार्चला कराड स्थानकापर्यंत धावेल. ही गाडी कराड ते सातारादरम्यान रद्द राहील. साताराहून सुटणारी सातारा-दादर एक्स्प्रेस ३० मार्चला कराड स्थानकातून सुटेल. ही गाडी सातारा ते कराड रद्द राहील. गोंदियाहून सुटणारी गोंदिया -कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ३० मार्चला पुण्यापर्यंत धावेल. पुणे ते कोल्हापूरदरम्यान ही गाडी रद्द राहील. तसेच, कोल्हापूरहून सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यातून सुटेल. कोल्हापूर ते पुणे दरम्यान ही गाडी रद्द राहील.

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

चंडीगडहून सुटणारी चंडीगड यशवंतपूर एक्स्प्रेस ३० मार्चला मनमाड-दौंड कॉर्ड लाईन-पुणे-दौंड-कुर्डूवाडी-पंढरपूर-मिरज या मार्गाने धावेल. बंगळुरूहून सुटणारी बंगळुरू-गांधीधाम एक्स्प्रेस ३० मार्चला मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी-दौंड-पुणे या मार्गाने धावेल. याचबरोबर ३१ मार्चला कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस चार तास विलंबाने दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि मुंबई-होसपेट एक्स्प्रेस तीन तास विलंबाने रात्री १२.२० वाजता सुटेल.

हेही वाचा – VIDEO : सुनील तटकरेंवर शेकापच्या जयंत पाटीलांची शेलक्या शब्दांत टीका

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस ३१ मार्चला दीड तसा विलंबाने धावेल. लोहमार्गांचे दुहेरीकरण आणि देखभाल व दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे गाडी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.