सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडत असताना काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तुमच्या विरोधात मी लोकसभेची उमेदवार आहे. भिडायचे तर माझ्याशी भिडा, वडिलांवर का टीका करता ? अशा शब्दात त्यांनी सातपुते यांच्यावर हल्लाबोल केला.

भाजपचे उमेदवार आमदार सातपुते यांनी मागील तीन दिवसांत सुशीलकुमार शिंदे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. तोच धागा पकडून आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर शाब्दिक फटके मारले. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आयोजिलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी स्वतः सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रल्हाद काशीद आदी उपस्थित होते.

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यावर हल्लाबोल करताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर लोकसभा लढतीत तुमच्या विरोधात मी उमेदवार आहे. भिडायचे तर मला भिडा ना, पराभव समोर दिसू लागल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. माझ्या वडिलांनी प्रचंड संघर्ष करून आणि कार्यकर्तृत्व सिद्ध करून यश मिळविले आहे. त्यांच्यावर टीका करताना तुमच्यात सभ्यता, शिष्टाचार, संस्कार आहेत नसावेत. राजमाता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाबाई, गांधी-नेहरूंनी दिलेले जे संस्कार आहेत, तेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संस्कार आहेत. त्याच संस्कारातून मी आमदार म्हणून उभी आहे. आज मी आणि सुप्रिया सुळे लोकसभेसाठी लढत आहोत आणि भिडत आहोत. आमचे दोघांचे वडील पक्षासाठी वणवण फिरत आहेत.

हेही वाचा – विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

हेही वाचा – VIDEO : सुनील तटकरेंवर शेकापच्या जयंत पाटीलांची शेलक्या शब्दांत टीका

आमदार सातपुते यांनी माजी मुख्यमंत्र्याची कन्या विरुद्ध ऊसतोड मजुराचा मुलगा अशी लढाई सोलापूर लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचे सांगत स्वतःच्या खोट्या गरिबीचा दाखला देत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आमदार प्रणिती शिंदे यांनी, मागील दहा वर्षांत सोलापुरात भाजपच्या दोन खासदारांनी लोकहिताची कोणती कामे केली, त्याबद्दल बोला आणि लोकांना ठरवू द्या कोण काबील आहे ते, अशाही शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले.