गेल्या काही दिवसांत उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना अचानक झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे दिलासा मिळाला आहे. आजचा रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस असल्याने घरात निवांत पहुडलेल्या बहुतांश पुणेकरांनी या पावसामुळे आनंद व्यक्त केला आहे. संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली हा पाऊस अजूनही सुरुच आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, पुणे शहरातील बिबवेवाडी, धनकवडी, मार्केटयार्ड, गुलटेकडी, भापकर पेट्रेप पंप परिसरात हलक्याशा पावसाला सुरुवात झाली. तसेच पिंपरी-चिंचवडच्या दापोडी, पिंपळे गुरव या भागात साडेचारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. यावेळी ऊन पावसाचा खेळ नागरिकांना अनुभवायला मिळाला.

काही काळ पावसाने अचानक हजेरी लावल्याने लहान मुले घराच्या बाहेर येऊन या पावसाचा आनंद घेत होती. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पिंपरी-चिंचवडच्या विविध भागात बरसला. या पावसामुळे काही काळ का होईना उकड्यापासून नागरिकांची सुटका झाली. तर, बच्चेकंपनीला घराबाहेर जाऊन पावसात मनसोक्त भिजण्याची सूटही त्यांच्या आई वडिलांनी दिली.

पुण्याच्या डेक्कन परिसरात संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अजूनही पाऊस सुरु असून सुट्टीमुळे रस्त्यांवर काही प्रमाणावर गर्दी असली तरी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. मात्र, हलक्या शिडकाव्याच्या या पावसात नागरिकांनी मनसोक्त भिजणेही पसंद केले.