राज्यात कोकण, सह्य़ाद्रीचे घाट माथे आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने चांगली सुरुवात केली असून, पुढील तीनचार दिवस त्याचा जोर कायम राहणार आहे. या तुलनेत विदर्भ आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. विदर्भात ही उणीव रविवारपासून (१३ जुलै), तर मराठवाडय़ात सोमवारपासून (१४ जुलै) भरून निघेल. त्या भागात पुढे दोनतीन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.
कोकणात गेल्या तीनचार दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात शुक्रवार-शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. धरणांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यांवरही पावसाचा जोर कायम आहे. महाबळेश्वर, कोयना, गगनबावडा, लोणावळा, इगतपुरी या पट्टय़ात सर्वत्र त्याची नोंद झाली. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या धरणांच्या क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. शनिवारीा सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईत कुलाबा येथे ३८ मिलिमीटर पाऊस पडला. सांताक्रुझ (४१ मिलिमीटर), अलिबाग (१०), रत्नागिरी (३२), डहाणू (४), भीरा (२२) येथेही संततधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात पुणे (५), कोल्हापूर (७), सांगली (१), सातारा (१), सोलापूर (२) येथेही पाऊस झाला. मराठवाडय़ात उस्मानाबाद येथे १ मिलिमीटर, तर विदर्भात नागपूर येथे ०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पुणे वेधशाळेचे अधिकारी डॉ. पीसीएस राव यांनी सांगितले, की राज्यात पावसाचा जोर पुढील तीनचार दिवस कायम राहणार आहे. विदर्भात रविवारपासून चांगल्या पावसाला सुरुवात होईल. हेच मराठवाडय़ात सोमवारपासून घडेल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2014 रोजी प्रकाशित
कोकण, मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस
राज्यात कोकण, सह्य़ाद्रीचे घाट माथे आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने चांगली सुरुवात केली असून, पुढील तीनचार दिवस त्याचा जोर कायम राहणार आहे

First published on: 13-07-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain monsoon start