छत्तीसगडपासून तामिळनाडूपर्यंत वाऱ्यांच्या विचित्र स्थितीमुळे राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. येत्या चोवीस तासांत राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाळा कडाका वाढला होता. तापमानाने चाळिशी ओलांडल्यामुळे चांगलाच उकाडा वाढला होता. मात्र, राज्यात पुन्हा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाने शनिवारी तडाखा दिला. त्याच बरोबर रविवारी दिवसभरात मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. महाबळेश्वर येथे दुपारी तीनच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास जोरदार वादळी पाऊस झाला. या ठिकाणी १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्हय़ात काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. सध्या छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू दरम्यान वाऱ्याच्या विचित्र स्थिती (विंड डिस्कन्टिन्युटी) निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून या भागात वादळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान कमी झाले आहे. त्यामुळे उकाडय़ापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात येत्या ४८ तासांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुणे शहरात दुपारपासून ढगाळ हवामान होते. त्यामुळे दुपारी प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी जोरदार पाऊस येण्याची शक्यता होती. जिल्ह्य़ात ओतूर, ताम्हिणी परिसरात काही ठिकाणी पाऊस झाला. येत्या चोवीस तासांत शहरात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील गुंजेवाडी आणि अंबेजवळगा या दोन गावांमध्ये सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सलग अर्धा तास मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली, त्यामुळे परिसरातील फळबागांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती तलाठी थोरात सांगितली. जमिनीवर आणि शिवारामध्ये सलग झालेल्या गारपिटीमुळे अर्धा फुटांहून अधिक गारांचा थर साचलेला आहे. शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना आणि शिवारातील जनावरांना गारपिटीमुळे गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे. पहिल्यांदाच या परिसरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली असून सगळीकडे बर्फाचे थर दिसत होते.