अनधिकृत बांधकामप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांच्या राहत्या घरांना संरक्षण दिले पाहिजे व अन्य अनधिकृत बांधकामे पाडली पाहिजे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली असताना विरोधकांकडून हा मुद्दा चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात येत असून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे, असे शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.
चिंचवड-वाल्हेकरवाडीच्या सभेत राज यांनी केलेल्या भाषणात या पुढील काळात अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, असा मुद्दा प्रकर्षांने मांडला. तेव्हा यापूर्वी, बिल्डरांकडून फसवणूक झालेल्या नागरिकांच्या राहत्या घरांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र, अन्य अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे, असे विधान केले. मात्र, ठाकरे यांनी सरसकट बांधकामे पाडण्याची भूमिका घेतली, असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू झाला. त्यांची भूमिका स्पष्ट असताना विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. ही बांधकामे नियमित व्हावी, यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, आघाडी सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली. पायाखालची वाळू घसरू लागल्याने विरोधकांकडून संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. मात्र, हा फसवा डाव असल्याचे जनतेने लक्षात घ्यावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. शेकापने आंदोलने व सनदशीर मार्गाने उरण व पनवेलमधील सिडको हद्दीतील अनधिकृत बांधकामांना चार एफएसआय मिळवून देण्यास राज्य सरकारला भाग पाडले, त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडची बांधकामे नियमित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. वेळप्रसंगी हौतात्म्य पत्करू, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Apr 2014 रोजी प्रकाशित
राज ठाकरे यांच्या वक्तव्यासंदर्भात विरोधकांकडून अपप्रचार – जयंत पाटील
चिंचवड-वाल्हेकरवाडीच्या सभेत राज यांनी केलेल्या भाषणात या पुढील काळात अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, असा मुद्दा प्रकर्षांने मांडला. तेव्हा यापूर्वी, फसवणूक झालेल्या नागरिकांच्या राहत्या घरांना संरक्षण दिले पाहिजे.
First published on: 16-04-2014 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray jayant patil construction