टोल मागायला कोणी आडवा आला, तर त्याला तुडवून काढा… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या इशाऱयाला राज्यातील टोलचालक घाबरल्याचे चित्र आहे. राज ठाकरे गुरुवारी पूर्वनियोजित दौऱयासाठी मुंबईहून पुण्याकडे येताना त्यांच्यासोबत असलेल्या वाहनांच्या ताफ्यातील कोणाकडूनही टोल वसूल करण्यात आला नाही. राज ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा येण्याआधी १५ ते २० मिनिटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यांवरील एक मार्गिका मोकळी ठेवण्यात आली होती. राज ठाकरे यांच्यासोबतच्या वाहनांचा ताफा त्याच मार्गिकेमधून पुढे गेला. यावेळी राज ठाकरे यांच्या गाडीला किंवा त्यांच्या ताफ्यातील कोणत्याही गाडीला थांबवून त्यांच्याकडे टोल मागण्यात आला नाही.
राज ठाकरे गुरुवारपासून रविवारपर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्यातच मुक्कामाला आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मनसैनिकांनी टोल फोड केली होती. खेड-शिवापूर आणि मांजरी टोलनाक्यावर केलेल्या तोडफोडीप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला या गुन्ह्यांप्रकरणी राज ठाकरे यांना पुणे दौऱयावेळी अटक केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांना तूर्ततरी अटक करणार नसल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतरच न्यायालयाच्या आदेशानुसार गरज पडल्यास त्यांना अटक केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.