डॉ. रामचंद्र देखणे (संतसाहित्य आणि लोकसाहित्याचे अभ्यासक)
माझ्या संतसाहित्यापासून इतर सर्वच वाचन प्रवासात आई आणि बाबांनी केलेल्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. विविधांगी साहित्याच्या वाचनातून मिळालेले ज्ञानाचे विवेकत्व आज इतरांपर्यंत पोहोचविणे मला शक्य होत आहे. माझ्याकडील वाचनसंपत्ती ही इतरांपर्यंत पोहोचविण्याकरिता माझ्या बुकशेल्फमधील पुस्तके अभ्यास आणि चिंतनाकरिता सर्वासाठी खुली ठेवली आहेत.
श्रावण महिन्यात आमच्या गावामध्ये (कारेगाव, ता. शिरुर) पोथीवाचनाचे कार्यक्रम होत असत. त्यामध्ये माझे वडील अनंत देखणे हे खणखणीत आवाजात पोथीवाचन करीत. त्यांना लहानपणापासून वाचनाची गोडी होती. त्यामुळे ‘भक्तिविजय’, ‘पांडवप्रताप’, ‘नवनाथ’, ‘रामविजय’ यांसारख्या पोथीवाचनातून त्यातील कथा गावकऱ्यांना ते खुलवून सांगायचे. माझ्या डोळ्यासमोर लहानपणापासूनच ते दृश्य आणि कानामध्ये पोथीवाचनाचे स्वर निनादत होते. त्यामुळे मीसुद्धा इयत्ता चौेथीपासूनच वडिलांसमवेत मोठय़ाने पोथीवाचन करायला लागलो. बाबा वाचन करताना थांबले की मी वाचायला सुरुवात करायचो, असा काहीसा श्रावणातील आमचा दिनक्रम. त्यामुळे कळत-नकळत वाचनाची सुरुवात झाली, ती आमच्या गावापासूनच. पोथीवाचनाप्रमाणेच भारुड सादरीकरणदेखील होत असे. त्या वेळी ‘याचा अर्थ काय?’ असे आई विचारत असे. ‘याचा अर्थ काय?’ हा प्रश्न माझ्या कायम मनात राहिला आणि मी पुढे त्या विषयावरच पीएच. डी. केली. माझ्या संतसाहित्यापासून इतर सर्वच वाचन प्रवासात आई आणि बाबांनी केलेल्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच विविधांगी साहित्याच्या वाचनातून मिळालेले ज्ञानाचे विवेकत्व आज इतरांपर्यंत पोहोचविणे मला शक्य होत आहे.
माझ्या लहानपणी कारेगावमध्ये ग्रंथालय किंवा वाचनाशी संबंधित इतर सुविधा नव्हत्या. परंतु गावात गुरुजींकडे दोन दिवस उशिराने एक वर्तमानपत्र येत असे. माझ्या वडिलांना वाचनाची आवड असल्याने गुरुजींचे वाचन झाले, की आमच्या घरी ते वर्तमानपत्र आणत आणि आम्हा सगळ्यांना त्यातील घडामोडी सांगत. वर्तमानपत्रे आणि पोथीवाचन हीच माझ्या वाचनप्रवासाची सुरुवात. केवळ वाचनापुरते मर्यादित न राहता वडिलांनी त्या पोथीची निगा राखणे, पाने नीट लावून घेणे, पोथीचे वस्त्र बदलणे अशा साहित्य संपदा संवर्धनाच्या गोष्टी त्यांनी मला शिकविल्या. त्यामुळेच मला साहित्याविषयी प्रेम, आवड आणि तितकीच आपुलकी निर्माण झाली. पोथीवाचनातून नानाविध गोष्टींचे ज्ञान झाले. प्रामुख्याने पोथीवाचन केवळ धार्मिक अंगाने नसून त्यातून रंगभूमीवरील अनेक प्रयोगांच्या कथांची उत्पत्ती झाल्याचेही समोर आले. त्यामुळे माझा त्या वाचनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मराठीमध्ये कहाणी हा प्रकार माझ्या जवळचा. प्रत्येक कहाणीत वेगवेगळी मूल्ये समाविष्ट आहेत. कहाणीतील जीवनदर्शनातून ती मूल्ये आपल्याला वेचता यायला हवीत, असे मला नेहमी वाटे. एकदा माझे वडील पुण्याला गेले असताना पुन्हा लवकर का आले नाहीत, हे पत्राने कळविले. प्रत्यक्षात ते आजारी पडले होते असे त्यांनी त्या पत्रात लिहिले होते. त्यांचे अक्षर नीट वाचता न आल्याने मी सहजच त्यांना म्हणालो, तुम्हाला कुठे चांगले अक्षर काढता येते. वडिलांना अशा प्रकारे मी उलट उत्तर दिल्याची खंत आईच्या मनात राहिली आणि तिने मला ‘श्यामची आई’ हे पुस्तक आणून दिले. आमची आíथक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे आईने गावातील तीन-चार किराणा दुकानातून चहाच्या पाकिटात असलेले कोरे कागद गोळा केले आणि सुई-दोऱ्याने शिवून त्याची वही करून मला दिली. ‘श्यामची आई’ हे पुस्तक तिने माझ्याकडून चक्क लिहून घेतले. लिखाणाच्यानिमित्ताने माझे अक्षर सुधारले आणि पुस्तक वाचून मला माझी चूकही समजली. वाचन-लेखनाद्वारे संस्कार घडविणारे विद्यापीठ आमच्या घरामध्येच असल्याने मी आज साहित्य क्षेत्रात भरारी घेऊ शकलो.
‘आनंद’ मासिक, ‘सह्याद्री बालविशेषांक’ ही शिरुरला माध्यमिक शिक्षणादरम्यान माझ्या हातात पडलेली पुस्तके. पुढे पुण्यात १९७२ च्या सुमारास शिक्षणासाठी आलो आणि स. प. महाविद्यालयात बी. एस्सी. साठी प्रवेश घेतला. त्या वेळी महाविद्यालयातील ग्रंथालयात विभावरी शिरुरकर, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांचे साहित्य वाचनात आले. विभावरी शिरुरकर यांच्या कादंबरीवरुन संदर्भ घेत मला लेखनाचे बीज मिळाले आणि ‘भाकर’ या मी लिहिलेल्या एकांकिकेला पारितोषिक मिळाले. या काळात वक्तृत्व, वादविवाद स्पध्रेत मी आवर्जून सहभागी होत असे. त्यासाठी लेखकांच्या साहित्यातून मिळालेल्या संदर्भाच्या नोंदी मी काढत होतो आणि आजही माझ्या घरामध्ये एक कपाट भरुन या नोंदीच्या वह्या जपून ठेवल्या आहेत.
एका वर्षी आमच्या गावामध्ये दुष्काळ पडल्याने मी हळहळलो आणि त्या वेळी आमच्या घरातील गाईला पांजरपोळात सोडण्याची वेळ आली. तेथे गाईला सोडल्यानंतर काही वेळाने त्या पांजरपोळ्याचे कुंपण आणि िभत तोडून ती गाय आमच्या घरी पुन्हा आली. त्या वेळी या विषयावर ‘जितराम’ ही पहिली कथा मी लिहिली. आजूबाजूचे वातावरण आणि लेखनासाठी पोषक असलेली दृष्टी समृद्ध होत असल्याने माझ्या लेखणीतून ही कथा कागदावर अवतरली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाणीप्रदूषण विभागात नोकरीला लागलो. त्या वेळी काही रिकामा वेळ मिळत असल्याने ललित अंगाने वाचन सुरु झाले. मी एम. ए. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन चार वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करीत अव्वल क्रमांक पटकाविला. त्या काळात कार्ल मार्क्स, समर्थ रामदास आणि इतर सामाजिक विषयांसंबंधी भरपूर वाचन झाले. माझ्या या वाचनावर विनोबा भावे, साने गुरुजी आणि मामासाहेब दांडेकर या तीन गुरुत्रयींच्या साहित्याचा प्रचंड प्रभाव होता.
माझा विवाह झाल्यानंतर दिवाळीमध्ये घरात नवीन वस्तूची खरेदी गरजेची होती. परंतु त्याचवेळी एका विक्रेत्याने मला अवघ्या पाचशे रुपयांत दुर्मीळ पुराणांचा संग्रह आला आहे, तुम्ही आवर्जून घ्या असा आग्रह केला. प्रत्यक्षात १९८४ मध्ये माझा महिन्याचा पगार पाचशे रुपये होता. परंतु माझी वाचनाची आवड पाहता, माझी पत्नी अंजली हिने मला पुस्तके घ्या, असे सांगितले. त्यामुळे घरामध्ये पुस्तकांची दिवाळी साजरी झाली आणि धनत्रयोदशीला धनाऐवजी पुस्तकांची पूजा झाली. त्यामुळे आजपर्यंत आमच्या घरामध्ये पुस्तकांची खूप भरभराट झाली आहे. तत्त्वचिंतनात्मक वाचन व्हावे, यासाठी आजही माझ्या एका कपाटात पुढील तीन महिन्यांत कोणती पुस्तके वाचायची हे मी बाजूला काढून ठेवतो. माझ्या बुकशेल्फमध्ये आध्यात्मिक शास्त्राची मूलतत्त्वे, अष्टादशी, ऋग्वेद भाषांतर, उपनिषद सार, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, प्राचीन मराठी संत, भागवतोत्तम संत एकनाथ, वारकरी संप्रदाय उदय-विकास असे शेकडो ग्रंथ आणि पुस्तके आहेत. संस्कृतीकोश लायब्ररी आणि डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासोबत रस्त्यावरील पुस्तक विक्रेत्यांकडून केलेल्या पुस्तकांच्या खरेदीची आठवण आजही तितकीच ताजी आहे. किंबहुना त्या रस्त्यावरील पुस्तक विक्रेत्याचे आणि एखाद्या वाचनवेडय़ाचे संवाद, नातेप्रसंग कसे असतील, यावर मी ‘एरवाळीचं येणं’ हे पुस्तकही लिहिले आहे. केवळ चित्रपट पाहून आपण एखाद्या विषयावर चिंतन किंवा आपले मत तयार करू शकत नाही. त्याकरिता वाचन करणे आवश्यक आहे. सध्या इंटरनेटवर सर्व माहिती उपलब्ध आहे. परंतु, ती माहिती खरी आहे का, हे आपणहून पडताळण्याकरिता वाचन करून त्यावर विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे माझ्याकडील वाचनसंपत्ती ही इतरांपर्यंत पोहोचविण्याकरिता माझ्या बुकशेल्फमधील पुस्तके अभ्यास आणि चिंतनाकरिता सर्वासाठी खुली ठेवली आहेत.