आजवर अनेक पक्षांशी आमची युती झाली आहे. परंतु, एकाही मित्रपक्षाची मते आम्हाला मिळाली नाहीत. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचा एकही आमदार, खासदार निवडून येत नाही, अशी खंत आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी व्यक्त केली. आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती केल्यास दोन्ही पक्षांना फायदा होईल. मात्र, शिवसेनेने युती न केल्यास त्यांचे काही नेते फुटतील, असेही ते म्हणाले.
रविवारी (२७ मे) होणाऱ्या आरपीआयच्या राज्यव्यापी अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. केंद्र सरकार, पेट्रोलची भाववाढ, आगामी निवडणुकांबाबत त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, अधिवेशनात पक्षाची भविष्यातील वाटचाल आणि आगामी निवडणुकांमधील भूमिका यांवर विचारमंथन होणार आहे. श्री शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी स्कूलच्या (एसएसपीएमएस) मैदानावर पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वापर करून घेतला जातो. त्यानंतर सत्तेत कुठेही संधी दिली जात नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या विविध महामंडळांवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.