ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या रामटेकडी येथील प्रक्रिया प्रकल्पामध्ये महापालिकेने केलेल्या विविध सुधारणांची पाहणी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप झालेली नसल्यामुळे हा प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रामकेटडी येथील दिशा प्रकल्पाला त्याचा फटका बसला आहे.

शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी विविध भागांत कचरा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात उच्च पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार तेथे उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पामध्ये केलेल्या सुधारणांची माहिती महापालिका प्रशासनाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळालाही देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही त्याची पाहणी झालेली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

शंभर टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प दिशा बायोफर्टतर्फे चालवला जातो. प्रकल्पात प्रदूषण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकल्पामध्ये आवश्यक त्या सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी ‘निरी’ या संस्थेची नेमणूक करण्यात आली. संस्थेने या प्रकल्पामध्ये आठ ते दहा उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावणे, प्रकल्प पूर्ण बंदिस्त करणे असे काही उपायही सुचविण्यात आले होते. या सर्व बाबींची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र हा प्रकल्प सु करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र प्रकल्पाची पाहणी न झाल्यामुळे हा प्रकल्प सुरू करण्यास अडचणी निर्माण झाल्या असल्याचे सांगण्यात आले.

६ कचरा प्रक्रिया प्रकल्पांची नव्याने उभारणी

पुणे : एका बाजूला कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच महापालिका प्रशासनाकडून नव्याने सहा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रतिदिन पंचवीस ते पन्नास टन क्षमतेपर्यंतचे हे प्रक्रिया प्रकल्प असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. कचरा प्रक्रिया करण्यासाठी यापूर्वी प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो. त्या भागातील कचरा त्याच भागात जिरविण्यासाठी हे प्रक्रिया प्रकल्प उपयुक्त ठरत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच या प्रकारच्या प्रकल्पांची संख्या वाढविण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यादृष्टीने पंचवीस ते पन्नास टन क्षमतेपर्यंतचे प्रक्रिया प्रकल्प नव्याने उभारण्यात येणार आहेत. प्रभागातील प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता हे पाच टनापर्यंत मर्यादित आहे. त्यापेक्षा मोठय़ा क्षमतेचे प्रकल्प असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हे सर्व प्रकल्प विशेषत: उपनगरामध्ये आहेत. वडगांव बुद्रुक, रामटेकडी, मुंढवा येथील शिंदे वस्ती येथे प्रत्येकी पन्नास टनांचे तर नऱ्हे येथील पारी कंपनी जवळ, बनकर शाळेजवळ आणि कोरेगांव पार्क परिसरात प्रत्येकी पंचवीस टनांचे प्रक्रिया प्रकल्प येत्या काही दिवसांमध्ये उभे राहणार आहेत. प्रकल्पांच्या उभारणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून या सहा पैकी पाच प्रकल्पांच्या कामांसाठीचे कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्यात आली आहे. याशिवाय महंमदवाडी आणि प्रभाग क्रमांक ६२ येथे अनुक्रमे पंचवीस आणि पन्नास टन क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

कचरा प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीवर कोटय़वधींचा खर्च

प्रतिनिधी : शहरातील कचऱ्याचे विकेंद्रीकरण करण्यासाठी आणि प्रभागात कचरा जिरवण्यासाठी शहराच्या विविध भागांत कमी क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील काही प्रकल्प सुरू असले तरी कमी क्षमतेच्या या प्रक्रिया प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेला वार्षिक कोटय़वधी रुपये खर्च करावे लागत आहेत.

कचऱ्याचे विकेंद्रीकरण करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरात एकूण पंचवीस ठिकाणी कमी क्षमतचे प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे.

या सर्व प्रकल्पांची क्षमता प्रत्येकी पाच टन एवढी आहे. या सर्व प्रकल्पांच्या उभारणीसाठी तब्बल आठ कोटी ६६ लाख ९४ हजार ४८० रुपये एवढा खर्च (प्रकल्पीय खर्च) करण्यात आला आहे आणि आतापर्यंत देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी ३८ लाख ७४ हजार ८६१ रुपये खर्च झाल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

देखभाल दुरुस्तीसाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खर्च केल्यानंतरही ९५ हजार ६६३ मेट्रीक टन कचऱ्यावर या पंचवीस प्रकल्पातून प्रक्रिया झालेली आहे. मॉडेल कॉलनी, हडपसर रॅम्प-२, वानवडी, बावधन, कात्रज कचरा रॅम्प-१, हडपसर रम्प-१, पेशवे पार्क-१, कात्रज कचरा रॅम्प -२, औंध क्षेत्रीय कार्यालय, कात्रज रेल्वे म्युझिमय, येरवडा हौसिंग बोर्ड, घोले रस्ता, फुलेनगर, तळजाई पठार-१, तळजाई पठार-२, धानोरी, पेशवे पार्क-२, कात्रज कचरा रॅम्प-३, कात्रज कचरा रॅम्प-४, बाणेर, के. के. मार्केट, वडगांवशेरी, वडगांव, येरवडा जेल या भागात हे प्रक्रिया प्रकल्प आहेत.

मात्र यातील काही प्रकल्पांना सन २०१० पासून २०१५ पर्यंत कचरा देण्यात आलेला नसल्याची बाब महापालिकेच्या आकडेवारीनुसार पुढे आली आहे. त्यामुळे या प्रक्रिया प्रकल्पांच्या कार्यक्षमतेबाबतही शंका निर्माण झाली असून प्रकल्पांची उभारणी आणि देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाया गेला आहे.