पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची गंभीर घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई शुभम गजानन मोहिते याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. मोहिते हा मोटार वाहन परिवन विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याने पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याला वडील आणि बहीण यांची सरकारी नोकरी घालवतो असे म्हणत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित यांच्यात वयाचे अंतर आहे. फिर्यादी या आरोपी पेक्षा वयाने मोठ्या आहेत. पोलीस शिपाई शुभमने फिर्यादी यांना लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा फिर्यादी यांनी नकार दिला. माझ्यासोबत लग्न न केल्यास बहीण आणि वडील यांना जीवे ठार मारण्याची धमकी फिर्यादी यांना दिली. यामुळे महिला पोलीस कर्मचारी या घाबरल्या होत्या, त्यांना आरोपी शुभम हा बळजबरीने बाहेर फिरण्यास घेऊन जात असे.
त्यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न देखील आरोपी शुभमने केला. याला फिर्यादी यांनी विरोध केला असता त्याला न जुमानता त्यांच्यावर बलात्कार केला. दरम्यान, फिर्यादी यांनी लग्नाचा विषय काढल्यानंतर आरोपी हा विषय बदलून टाळाटाळ करत, लग्नास नकार देत होता. पोलिसांत तक्रार केलीस तर वडील आणि बहीण यांची सरकार नोकरी घालवेन अशी धमकी शुभमने दिली होती. तसेच फिर्यादी यांनी आरोपीच्या आई आणि बहिणीस सांगितले असता त्यांनी जातीवरुन लग्नास नकार दिला असं फिर्यादत सांगितलं आहे.
