भयकथेमध्ये भयाला, तर गूढकथेमध्ये कथेला महत्त्व आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोन, मानवी संबंध, सामाजिक प्रश्न अशा वेगवेगळ्या पातळीवर गूढकथेच्या माध्यमातून आशय अभिव्यक्त करता येतो. गूढकथा आकृतीबंधाच्या या शक्यताच समीक्षकांच्या ध्यानात आल्या नाहीत. त्यामुळे गूढकथेचे महत्त्व मराठी साहित्याला समजलेच नाही, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार रत्नाकर मतकरी यांनी सोमवारी व्यक्त केली.
मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे मतकरी यांच्याशी त्यांचे चिरंजीव आणि चित्रपट अभ्यासक गणेश मतकरी यांनी संवाद साधला. मतकरी यांच्या ‘संदेह’ आणि ‘परदेशी’ या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या हस्ते झाले. आभा तळवलकर यांनी संदेह संग्रहातील कथेचे अभिवाचन केले.
काही कवी उत्तम गद्यलेखन करू शकतात. पण, तसे ते करीत नाहीत. त्याचप्रमाणे गूढकथा लिहिल्याने आपण दुय्यम दर्जाचे लेखक होऊ की काय या भीतीपोटी अनेकजण गूढकथा लेखनासाठी धजावले नाहीत, याकडेही मतकरी यांनी लक्ष वेधले. कथा, कादंबरी, गूढकथा, नाटक आणि बालनाटय़ हे सगळेच आकृतीबंध मला आवडतात. आशयाला न्याय देणारा आकृतीबंध स्वीकारतो. आशयालाच त्याचा आकृतीबंध ठरवू द्यावा. या आशयाची नेमकेपणाने मांडणी करण्यासाठी खूप काही सुचायला हवं आणि लिहिण्याची शिस्तही असायला हवी, असेही मतकरी यांनी सांगितले.
मला जसे नाटक दिसते तसे ते रंगभूमीवर आले पाहिजे या उद्देशाने काही नाटकांचे दिग्दर्शन मी केले. अर्थात माझ्या नाटकांसाठी कमलाकर सारंग, अरिवद देशपांडे, दामू केंकरे यांच्यासह विजय केंकरे, मंगेश कदम या पुढच्या पिढीतील दिग्दर्शकांनीही दिग्दर्शन केले. मात्र, दुसऱ्या कोणी दिग्दर्शन केले तर संहितेशी प्रतारणा होऊ शकेल असे वाटल्याने मी दिग्दर्शन केले, असे सांगताना त्यांनी ‘इंदिरा’ नाटकाचे अनुभव कथन केले. ज्याची कुचंबणा होते त्याच्याविषयी कलावंताला सहानुभूती वाटते. कदाचित ही डावी भूमिका वाटेल. पण, त्यासाठी डावे असलेच पाहिजे असे नाही, असे मतकरी यांनी सांगितले. झोपडपट्टीतील मुलांना नाटक शिकविण्याचा अनुभव त्यांनी सांगितला.