भक्ती बिसुरे, लोकसत्ता

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने देशभर विविध कल्याणकारी कार्यक्रम सध्या हाती घेण्यात येत आहेत. आरोग्य क्षेत्रातील अत्यावश्यक रक्तदान चळवळही याला अपवाद नाही. १५ ऑगस्टलाच रक्तदान शिबीर घेण्याच्या इच्छेमुळे गेल्या काही दिवसांतील नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्या रक्त आणि रक्तघटक संकलनात घट झाली आहे.

देशातील अनेक व्यक्ती या व्रताप्रमाणे नियमित रक्तदान करतात. एकदा रक्तदान केल्यानंतर तो रक्तदाता तीन महिने रक्तदान करू शकत नाही. त्याचाच परिणाम म्हणून अनेक रक्तपेढय़ा १५ ऑगस्टला रक्तदान शिबीर घेण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील नियोजित शिबीर लांबणीवर टाकत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात येत आहे.

राज्यात रक्ताचा थेट तुटवडा नाही, मात्र मागील महिन्यातील संकलनाच्या तुलनेत या महिन्यातील सद्य:स्थितीतील संकलन कमी असल्याचे रक्तदान चळवळीतील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. दर महिन्याला राज्यभर ५० किंवा त्याहून अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यातून पुरेसा रक्तसाठा संकलित होतो आणि सद्य:स्थितीत राज्यात रक्ताचा गरजेपुरता साठा उपलब्ध असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

सर्वसाधारण परिस्थितीत राज्यात सुमारे तीन ते पाच हजार युनिट रक्त वापरले जाते आणि तेवढय़ा साठय़ाचे संकलनही होते. राज्यातील रक्तपेढय़ांमध्ये दररोज सुमारे २० ते २५ दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असते.

गेल्या महिन्यात आताच्या तारखेपर्यंत उपलब्ध रक्तसाठा या महिन्यात संकलित झालेला नाही. कारण नियमितपणे रक्तदान कार्यक्रम राबवणाऱ्या बहुतांश संस्था आणि संघटनांना १५ ऑगस्टच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाची प्रतीक्षा आहे. या आठवडय़ापासून राज्यातील अनेक भागांमध्ये सलग रक्तदान शिबीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रक्ताचा तुटवडा नाही मात्र संकलनावर परिणाम झाला आहे.      

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. शंकर मुगावे, राज्यातील रक्तपेढय़ांचे विभागीय समन्वयक