scorecardresearch

पुणे : दिवाळीत मिळणार खाद्यतेलांच्या स्वस्ताईचा दिलासा ; पामतेलाची आयात ३३ टक्क्यांनी वाढली

ऑगस्ट महिन्यात खाद्यतेलांच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२१च्या तुलनेत ऑगस्ट २०२२मध्ये पामतेलाची आयात ३३ टक्क्यांनी वाढली आहे.

पुणे : दिवाळीत मिळणार खाद्यतेलांच्या स्वस्ताईचा दिलासा ; पामतेलाची आयात ३३ टक्क्यांनी वाढली
( संग्रहित छायचित्र )

ऑगस्ट महिन्यात खाद्यतेलांच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२१च्या तुलनेत ऑगस्ट २०२२मध्ये पामतेलाची आयात ३३ टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक बाजारात खाद्यतेलांच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे देशातील खाद्यतेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात आयात करण्याचे धोरण स्वीकारले आहे. परिणामी यंदाच्या दिवाळी सणात खाद्यतेलांच्या स्वस्ताईचा फायदा सामान्य ग्राहकांना मिळणार आहे.

हेही वाचा >>> चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला पत्नीचा खून आणि…

सॉलव्हंट एक्सट्रॅक्ट असोशिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार कच्चे आणि रिफाईंड केलेल्या खाद्यतेलांच्या आयातीत ऑगस्ट २०२१च्या तुलनेत ऑगस्ट २०२२ मध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या ऑगस्टमध्ये १,०५३,८१० टन तेलाची आयात झाली होती. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १,४०१,२३३ टनाची आयात झाली आहे. त्यामध्ये १,३७५,००२ खाद्य आणि २६,२३३ अखाद्य तेलाच्या आयातीचा समावेश आहे. नोव्हेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या ऑईल वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत ११,३७६,२२६ टनांची आयात झाली आहे. मागील वर्षात याच काळात १०,७०८,४४६ टनांची आयात झाली होती.

हेही वाचा >>> पुणे : ऑस्ट्रेलियात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

तेलबियांच्या लागवडीत घट
सॉलव्हंट एक्सट्रॅक्ट असोशिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार नऊ सप्टेंबरपर्यंत खरीप हंगामात एकूण १८९.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या खरिपात १९०.९२ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. सोयाबीनच्या लागवडीने सरासरी गाठली आहे. पण, भुईमुगाची लागवड ३.५९ लाख हेक्टरने कमी झाली आहे. यंदा ४५.३५ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी ४८.९४ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. एरंडाच्या लागवडीत १.९६ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा एकूण ७.९५ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी ५.९९ लाख हेक्टरवर लागवड झाली होती.

हेही वाचा >>> पिंपरी : कोट्यवधी खर्चूनही नाशिकफाटा चौकाचा श्वास कोंडलेला ; पादचाऱ्यांसाठी तारेवरची कसरत

देशात २४ लाख टन खाद्यतेलाचा साठा
जागतिक बाजारात रशिया-युक्रेनमधून येणाऱ्या सूर्यफूल तेलाचा पुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला आहे. त्यामुळे जागतिक खाद्यतेलाच्या दरात घसरण सुरू झाली आहे. त्या शिवाय केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्क माफ केल्यामुळे देशातील कंपन्या,व्यापारी पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाचा साठा करीत आहेत. एक सप्टेंबर रोजी देशातील विविध बंदरांवर सुमारे ६,११००० टन खाद्यतेलाचा साठा आहे. त्यात ८७,००० टन पामतेल, १,९०००० टन सोयाबीन तेल १,६६००० टन सूर्यफूल तेलाचा समावेश आहे. तर देशातील एकूण खाद्यतेलाचा साठा सुमारे २४ लाख ३६००० टन इतका आहे. दिवाळीच्या तोंडावर व्यापारी मोठ्या प्रमाणावर साठा करीत आहेत. एकूणच दरात घसरण सुरू असल्यामुळे सामान्यांना दिवाळीत खाद्यतेलाच्या स्वस्ताईचा फायदा होणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.