पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधनासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. चीनमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून, गेल्या काळात भारतीय विद्यार्थ्यांचा कल बदलून फॉरेन्सिक सायन्स, आरोग्य अशा अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी वळत आहेत.
ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन इंडिया डिजिटल एज्युकेशन हबचे संचालक विक सिंग यांनी ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनतर्फे ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे, अभ्यासक्रम, व्हिसा प्रक्रिया, शिष्यवृत्ती आदींबाबत माहिती देण्यासाठी स्टडी ऑस्ट्रेलिया हा कार्यक्रम पुण्यात झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेवेळी सिंग यांनी माहिती दिली.सध्या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये २ लाख ६० हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात आहेत. पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. अशा विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी प्रवेश घेतात. संशोधन हे महत्त्वाचे क्षेत्र असल्याने भारत-ऑस्ट्रेलियातील संशोधकांच्या सहकार्यासाठी आर्च इंडिया हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांसाठी भारत हा महत्त्वाचा देश आहे. येत्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी भारतातील असतील अशी अपेक्षा असल्याचे सिंग यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अभियंत्याची १५ लाखांची फसवणूक

ऑस्ट्रेलियन विद्यार्थी भारतात येऊ शकतील
भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार नव्या संधी प्राप्त होणार आहेत. त्यामुळे बरीच ऑस्ट्रेलियन विद्यापीठे भारतातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांशी विविध उपक्रम राबवण्याबाबत चर्चा करत आहेत. तसेच ऑस्ट्रेलियन विद्यार्थी भारतात शिकण्यासाठी येऊ शकतील. युनिव्हर्सिटी ऑफ वुलुगाँग गुजराजमध्ये शिक्षण केंद्र सुरू करणार आहे, अशी माहितीही सिंग यांनी दिली.