लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली प्रवेश परीक्षा तांत्रिक कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना देता आली नव्हती. विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर राज्य सीईटी सेलने स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार एमबीए सीईटी पुन्हा घेण्याचा निर्णय झाला असून, आता २७ एप्रिलला रोजी होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ११ एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल.

राज्य सीईटी सेलतर्फे एमबीए या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी २५ आणि २६ मार्चला राज्यभरातील १९१ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी देता आले नाही. काही ठिकाणी सर्व्हरच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यावर राज्य सीईटी सेलच्या नियोजनाबाबत विद्यार्थी-पालकांनी संतप्त भावना व्यक्‍त केल्या होत्या. तसेच एमबीएची सीईटी पुन्हा घेण्याची मागणी जोर धरू लागली होती.

आणखी वाचा- पुणे: सीईटी सेलच्या ‘या’ निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नंतर राज्य सीईटी सेलने चौकशी समिती स्थापन केली होती. परीक्षेबाबतच्या सर्व तक्रारींची शहानिशा करून चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार एमबीएची पुन्हा एकदा सीईटी घेण्याचा निर्णय झाला. तांत्रिक कारणामुळे सीईटी देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेच्या अर्जांसाठी ११ एप्रिल ही अंतिम मुदत आहे. तर परीक्षा २७ एप्रिलला सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत होईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.