पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. शर्मिला रेगे (४८) यांचे कर्करोगाने शनिवारी निधन झाले. त्यांच्यामागे वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
दलित स्त्रीवादाच्या अभ्यासिका म्हणून डॉ. रेगे यांची ओळख होती. दलित स्त्रियांच्या प्रश्नांवर त्यांनी अभ्यास केला. ‘दलित स्त्रीवादा’ची स्वतंत्र विषय म्हणून ओळख निर्माण करण्यामध्ये डॉ. रेगे यांचे मोठे योगदान आहे. समाजशास्त्र विषयामध्ये औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्त्रीवादाचा अभ्यास सुरू केला. डॉ. रेगे या १९९१ पासून पुणे विद्यापीठाच्या स्त्री-अभ्यास केंद्रामध्ये संशोधन आणि अध्यापनाचे काम करत होत्या.
स्त्रीवाद, जातीयवाद या विषयावर त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. डॉ. रेगे यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. स्त्रीवाद आणि संस्कृती, अध्यापन तंत्र या विषयांवरही त्यांनी संशोधन केले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आणि विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले होते.