शहरातील हॉटेल्स आणि मंगल कार्यालये यांच्याकडे शिल्लक राहिलेले चांगले अन्न गोळा करून ते भुकेल्यांना देण्याचा उपक्रम शहरात स्वयंसेवी वृत्तीने सुरू आहे आणि या उपक्रमाचा नव्या वर्षांत विस्तार होणार असून त्यामुळे हजारो भुकेल्यांना, गरजूंना, वंचितांना पोटभर अन्न मिळणार आहे.

या उपक्रमाचे संयोजक राजकुमार राठी यांनी ‘लोकसत्ता’शी साधलेला हा संवाद..
प्रश्न : रॉबिनहूड आर्मीचा नेमका उपक्रम पुण्यात कसा चालतो?
उत्तर : हॉटेलमध्ये, मंगल कार्यालयांमध्ये, तसेच केटरिंग व्यावसायिकांकडे अनेकदा मोठय़ा प्रमाणावर अन्न उरते. हे उरलेले अन्न फेकून दिले जाते. हेच अन्न गोळा करून ते गरजूंच्या, वंचितांच्या मुखी देण्याचा हा उपक्रम ‘रॉबिनहूड आर्मी’ ही स्वयंसेवी संस्था पुण्यात करते. ही मूळची दिल्लीतील संस्था असून पुण्यात मार्च २०१५ मध्ये संस्थेचे काम सुरू झाले. दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस हा उपक्रम केला जातो. दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष काम सुरू होते. संस्थेचे स्वयंसेवक दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा या वेळेत विविध हॉटलच्या पाकगृहांमध्ये तसेच मंगल कार्यालयांमध्ये जे अन्न उरलेले असते, ते गोळा करतात. त्यानंतर ते झोपडपट्टय़ा, वस्त्या आणि पदपथांवर राहणाऱ्या उपेक्षितांना, वंचितांना वाटले जाते. रात्री दहापर्यंत वाटपाचे काम चालते.
प्रश्न : गोळा केलेले अन्न कोठे वाटले जाते?
उत्तर : या उपक्रमाचे वेळापत्रक ठरलेले आहे. दर शुक्रवारी आकुर्डी परिसरात, शनिवारी डेक्कन जिमखाना परिसरात आणि रविवारी लष्कर परिसरात ही अन्नपदार्थ गोळा करण्याची मोहीम चालते. त्या त्या भागातील ठरावीक हॉटेल तसेच मंगल कार्यालयांची या उपक्रमामुळे मोठी सोय झाली आहे. त्यांच्या स्वयंपाकघरातील अन्न आता वाया न जाता ते गरजूंना मिळते.
 प्रश्न : कोणते अन्न या उपक्रमात गोळा केले जाते?
उत्तर : आमच्या या उपक्रमात हॉटेलमधील ग्राहकांनी टाकून दिलेले किंवा शिळे, खराब झालेले, ताटांमध्ये राहिलेले उष्टे अन्न गोळा केले जात नाही. फक्त हॉटेल, मंगल कार्यालये, केटर्स यांच्या स्वयंपाकघरात जे अन्न शिल्लक राहिलेले असते तेच गोळा केले जाते. अनेकदा कार्याला सांगितलेल्या व्यक्तींपेक्षा खूप कमी जण उपस्थित असतात. अशा वेळी मोठय़ा प्रमाणावर केलेले पदार्थ उरतात. ते पदार्थ वाया जाण्याऐवजी या उपक्रमामुळे गरजूंना मिळतात.
आमच्या या कामाचे आणखी एक विशेष म्हणजे संस्था कोणतीही आर्थिक देणगी स्वीकारत नाही. प्रत्यक्ष कामाची तयारी असलेल्यांना कोणालाही या उपक्रमात सहभागी होता येते.
प्रश्न : नव्या वर्षांसाठी संस्थेने कोणती योजना आखली आहे, उपक्रम पुढे कसा चालवला जाणार आहे?
उत्तर : संस्थेतर्फे सध्या आठवडय़ात तीन दिवस अन्न गोळा करण्याचे काम चालते. मात्र हा उपक्रम चांगला असल्यामुळे आणि अनेकांनी केलेल्या सूचनांचा विचार करून आता इतर दिवशी देखील हा उपक्रम करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे नव्या वर्षांत आठवडय़ाचे सर्व दिवस शहराच्या वेगवेगळ्या भागात अन्न गोळा करण्याचा उपक्रम करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्याच्या पद्धतीप्रमाणेच ते त्या त्या भागातील गरजूंना वाटले जाईल.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण