महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार येणार आहे आणि मी दिल्लीतून राज्यात परत येईन ते मुख्यमंत्री म्हणूनच. उपमुख्यमंत्री म्हणून मी राज्यात परत येणार नाही, असे जाहीर विधान करून भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी पुन्हा एकदा राजकीय चर्चा घडवून आणली आहे.
धनगर समाज उन्नती मंडळातर्फे राज्यस्तरीय चिंतन बैठकीचे आयोजन शनिवारी येथे करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना मुंडे यांनी मी मुख्यमंत्री म्हणूनच आता राज्यात परत येईन असे जाहीर केले. आमदार प्रकाश शेंडगे, माधुरी मिसाळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. धनगर समाजाला आरक्षणाचे लाभ मिळवून देणे आवश्यक असले, तरी सरकारकडे धनगर ऐवजी धनगड अशी जी नोंद झाली आहे ती दुरुस्त होण्याची गरज आहे. त्यासंबंधीची मागणी या बैठकीत करण्यात आली. त्याबाबत बोलताना मुंडे म्हणाले की, समाजाचा हा प्रश्न मी मुख्यमंत्री झालोकीच सोडवीन. महाराष्ट्रात यावेळी युतीचे सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तरच मी दिल्लीतून परत येणार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून मी आता राज्यात परत येणार नाही. आगामी काळासाठी मी योग्य रणनीती आखली असून माझी दिशा योग्य आहे.
महाराष्ट्रात मी महायुती केली आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीत वेगळे वातावरण तयार झाले आहे. मोदी यांच्या रूपाने देशाला यावेळी ओबीसी पंतप्रधान मिळणार असून धनगर समाजानेही महायुतीबरोबर राहावे, असे आवाहन मुंडे यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ते म्हणाले की, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, असे माझे मत आहे. मात्र राजकीय आरक्षण मिळवू देणार नाही. तसेच ओबीसींच्याही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.