कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे गेल्या पंधरा दिवसांपासून रखडलेला मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. तीन ते चार दिवसांच्या कालावधीत त्याचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास होणार आहे. या कालावधीत राज्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

देशातून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास २८ सप्टेंबरला सुरू झाला. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे त्याचा प्रवास थांबला होता.

दरम्यानच्या कालावधीत अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे स्थानिक वातावरणाचा परिणाम म्हणून राज्याच्या इतर भागांत दोन ते तीन दिवस पावसाची हजेरी राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २२ आणि २३ ऑक्टोबरला कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. २४ ऑक्टोबरनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरडय़ा हवामानाची स्थिती राहणार आहे.

पर्जन्यभान..

गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत मोसमी वाऱ्यांचा प्रवास थांबला होता. सध्या कमी दाबाच्या पट्टय़ांची तीव्रता कमी झाल्याने त्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे देशाच्या अनेक भागांत आता कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होत आहे. दोन- तीन दिवसांत राज्यातून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे.