आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका हा पिंपरी-चिंचवडचा भूतकाळ असून तशी श्रीमंतीची परिस्थिती आता राहिलेली नाही. ते गतवैभव होते, आता बऱ्यापैकी चित्र बदललेले आहे, असे मत महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी निगडीत बोलताना व्यक्त केले.
प्राधिकरणातील सावरकर मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेत ‘पिंपरी-चिंचवड २०३०’ या विषयावर ते बोलत होते.
आयुक्त पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड हे वेगाने वाढणारे देशात तिसरे तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे शहर आहे. गेल्या दहा वर्षांत झालेली वाढ मागील ४०० वर्षांतही झालेली नाही. २०३० मध्ये शहराची लोकसंख्या ३५ लाख असेल. येत्या ४० वर्षांत नऊपट लोकसंख्या वाढलेली असेल. त्यानुसार पायाभूत सुविधांवर ताण पडणार असून आतापासून नियोजन न केल्यास मोठय़ा अडचणी निर्माण होऊ शकतात. पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. सद्य:स्थितीत प्रतिमाणशी-प्रतिदिनी १८० लीटर पाणी दिले जाते. आगामी काळात हे प्रमाण ५० लीटपर्यंत खाली येऊ शकते, त्यासाठी पाण्याचा गैरवापर टाळण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मोशीतील कचरा डेपोची जागा पाच वर्षे पुरेल इतकीच आहे. पुनावळ्यात कचरा डेपो सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाहनांच्या संख्येची वाढ पाहता भविष्यात जागोजागी कोंडी होणार असून पार्किंगला जागा मिळू शकणार नाही. वाहतूक व्यवस्था वेळीच सुधारण्यासाठी बसची संख्या वाढली पाहिजे, रस्ते मोठे झाले पाहिजे. पार्किंगच्या सुविधा विशेषत: बहुमजली पार्किंगचा विचार करावा लागेल. पर्यावरणपूरक गोष्टी करण्यासाठी जलपर्णी, नदीतील गाळ, जलप्रदूषण, प्लास्टिकबंदी आदींविषयी धोरण लवकरच ठरवण्यात येणार आहे.
नागरिक दहशतीच्या छायेखाली
चुकीचे घडल्यास त्याचे परिणाम नागरिकांवर होतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूकपणे त्या चुका दाखवून देणे गरजेचे आहे. मात्र, आपल्याकडे प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. नागरिक पुढे येऊन तक्रारी करण्यास धजावत नाहीत. तक्रारदारांना, तुला येथे राहायचे की नाही, अशा धमक्या दिल्या जातात. पत्रकारांवरही खरे लिहिण्यावर दबाव आल्याची उदाहरणे आहेत. अशी मुस्कटदाबी होत असल्यास लोकशाही पद्धतीने काम होऊ शकणार नाही, असे मत डॉ. श्रीकर परदेशी यांनी या वेळी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2013 रोजी प्रकाशित
पिंपरी-चिंचवडची श्रीमंती हा भूतकाळ – डॉ. श्रीकर परदेशी
आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका हा पिंपरी-चिंचवडचा भूतकाळ असून तशी श्रीमंतीची परिस्थिती आता राहिलेली नाही. असे मत महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी निगडीत बोलताना व्यक्त केले.

First published on: 03-05-2013 at 01:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richest corp a mark of excellence for pcmc now remained as past dr pardeshi