केवळ संशोधन आणि लेखनासाठी समर्पित जीवन अशीच डाॅ. रा. चिं. ढेरे यांची ओळख. प्रसिद्ध कवयित्री डाॅ. अरुणा ढेरे, पर्यावरणविषयक लेखन करणाऱ्या वर्षा गजेंद्रगडकर आणि प्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद ढेरे यांनी त्यांचा लेखनाचा वारसा पुढे नेला. आता त्यांचा नातू ऋत्विकमुळे ढेरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीची नवी पालवी संशोधन आणि लेखनाच्या क्षेत्रामध्ये आली आहे.

‘हेर्मान ब्रॉख या विसाव्या शतकातील ऑस्ट्रियन कादंबरीकाराचे तत्त्वज्ञान आणि साहित्यशास्त्रावरील चिंतन, या चिंतनाचा त्याच्या साहित्यनिर्मितीवर झालेला प्रभाव आणि त्या चिंतनाची प्रत्यक्ष साहित्यकृतीमध्ये (विशेषतः ‘द स्लीपवॉकर्स’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीमध्ये) उमटलेली अभिव्यक्ती’ हा या प्रबंधाचा मुख्य गाभा आहे. ऋत्विकने जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातून जर्मन साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.) पूर्ण केले. त्यानंतर लगेचच त्याला म्युनिकमधील (जर्मनी) एल. एम. यू. विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. करोनाच्या प्रतिकूल काळामध्ये त्याने अभ्यासाला सुरुवात करून तीन वर्षांमध्ये पीएच.डी. प्रबंध पूर्ण केला. फ्रिड्रिश फोलहार्ड आणि थोमास बोरगार्ड या अत्यंत कडक शिस्तीच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्रबंध सादर केला आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याला पीएच.डी. मिळाली.

‘जर्मन साहित्यावर अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी प्रसिद्ध विद्यापीठांच्या यादीमध्ये एल.एम.यू. हे नाव अग्रस्थानी आहे. मुख्यतः पीएच.डी. प्रबंधांसाठी निकष फार कडक असतात. प्राध्यापकांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांकडून असणाऱ्या अपेक्षाही तेवढ्याच उंच असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण अभ्यासक एका विषयावर संशोधन करत असेल, तर ते काम दर्जेदारच झालं पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो आणि तसे काम करवून घेणे ही त्यांना त्यांची जबाबदारी वाटते. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला पीएच.डी.साठी निवडताना ते फार बारकाईने विचार करतात,’ असे निरीक्षण ऋत्विक याने नोंदविले.

जर्मनीत पीएच.डी.साठी नुसता प्रबंध पूर्ण करून भागत नाही. कला शाखेमध्ये पीएच. डी. केलेल्या सर्वांना ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ ही पदवी संपादन करण्याकरता त्यांचा प्रबंध पुस्तक रूपात प्रसिद्ध करणे बंधनकारक असते. त्यामुळे हाती घेतलेला प्रकल्प केवळ पदवी संपादन करून नावामागे डॉक्टर लावण्यासाठी नसतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंधित विषयांवर काम करणाऱ्या सर्व तरुण आणि अनुभवी संशोधकांसाठी हा प्रबंध खुला होऊन आतापर्यंतच्या संशोधनात नवी भर पडणार आहे, याची पुरेपूर जाणीव तिथल्या प्राध्यापकांना असते आणि विद्यार्थ्यांनाही ती असावी हा त्यांच्या उंचावलेल्या अपेक्षांमागचा हेतू असतो.

‘या प्रक्रियेचा भाग म्हणून आणि आतापर्यंत ब्रॉखच्या दुर्लक्षित म्हणाव्या अशा साहित्यावर प्रकाश टाकणाऱ्या प्रबंधाचा विसाव्या शतकातील जर्मन साहित्याचा अभ्यास करणाऱ्या सर्वांना लाभ घेता यावा, या हेतूने मी माझा प्रबंध पुस्तक रूपात प्रकाशित केला आहे. तत्त्वज्ञान आणि साहित्य यांच्यामधील परस्परसंवादाचा वेध घेणाऱ्या, या दोन क्षेत्रांचा मेळ घालू पाहणाऱ्या विषयांवरची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या, पाडरबॉर्न शहरातील ‘ब्रिल फिंक’ प्रकाशन संस्थेने एका युवा, परदेशी, नुकतीच पीएच.डी. पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्याचा प्रबंध प्रकाशित करणे ही बाब विशेष आहेच. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून संदर्भ सूचीच्या आणि अगदी अर्पणपत्रिकेच्या मांडणीपर्यंत सर्व काही लेखकाशी (ई-मेलद्वारे) चर्चा करून, त्याच्या अनुमतीनेच ठरवण्यात आले. संशोधनात्मक पुस्तकांसाठी जर्मनी आणि एकूण पाश्चात्त्य देशांमध्ये लेखकांना मानधन किंवा रॉयल्टी दिली जात नाही. उलट अशा पुस्तकांच्या छपाईचा खर्चही लेखकांना स्वतः द्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर ज्या संस्थेने मला पीएच. डी.करिता शिष्यवृत्ती दिली त्या संस्थेने आणि खुद्द एल.एम.यू. या विद्यापीठाने आर्थिक सहयोग देऊन पुस्तकाचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मोलाचा वाटा उचलला,’ अशी माहिती ऋत्विकने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हे पुस्तक आई-वडिलांबरोबर आजोबांना (डाॅ. रा. चिं. ढेरे) अर्पण केले आहे. डॉ. ढेरे यांचा नातू असल्यामुळे त्यांची संशोधनदृष्टी, त्यांची संशोधनपद्धती मला कळत-नकळत, पण जवळून अनुभवायला मिळाली. अनेक संशोधन प्रवासात आजोबांना सजगपणे सोबत केल्यामुळे माझ्यावर संशोधनाचे संस्कार झाले. आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि संशोधन करण्याच्या पद्धतीवर पडलेल्या आजोबांच्या या प्रभावाची कबुली देणे ही भावना या अर्पणपत्रिकेमागे आहे,’ असे ऋत्विकने नमूद केले.
vidyadhar.kulkarni@expressindia.com