गणेशखिंड रस्त्यावरील झाडे रस्तारुंदीकरणासाठी तोडण्याच्या पालिकेने घेतलेल्या निर्णयाला विविध संस्थांनी आणि निसर्गप्रेमींनी विरोध दर्शवला आहे. केवळ झाडांची तोड एवढाच मुद्दा नसून रस्त्यावरील वाहने वाढतात म्हणून रस्ता मोठा करणे हा उपायच चुकीचा आहे, असे संस्थांचे म्हणणे आहे.
वाहतूककोंडीचा प्रश्न रस्तारुंदीकरणाने सुटणार नसल्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील रस्तारुंदीकरण आणि त्यासाठी झाडे कापण्याचा हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी ‘परिसर’ या संस्थेचे खजिनदार सुजित पटवर्धन यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली.
गणेशखिंड रस्ता पूर्वी भरपूर वटवृक्षांसाठी ओळखला जात असे. परंतु १९९१ च्या सुमारास ही झाडे रस्तारुंदीकरणासाठी तोडली गेली. वृक्षतोड करणे योग्य नसले, तरी रस्ता मोठा करण्यासाठी त्याला पर्याय नाही, असा पालिकेचा आविर्भाव होता. पण पुन्हा पाच वर्षांनी रस्ता अपुरा पडत असण्याबद्दल तक्रार होऊ लागली. रस्तारुंदीकरणासाठी जागा नसल्यामुळे गणेशखिंड रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्यात आले. त्याचाही वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी उपयोग झाला नाही. उड्डाणपुलांची रचना सदोष असल्यामुळे वाहतूककोंडी कमी होण्यात अपयश मिळाले असेही आता म्हटले जाऊ लागले आहे. शहरात दररोज रस्त्यावर उतरणाऱ्या नवीन स्वयंचलित वाहनांची संख्या ५५० असून रस्तारुंदीकरण किंवा उड्डाणपुलांनी वाहतूककोंडीची समस्या सुटणार नाही, असा मुद्दा ‘परिसर’ने मांडला आहे. पटवर्धन म्हणाले, ‘पुण्यात गेल्या ६० वर्षांत वाहनांची संख्या शंभर पटींनी वाढली आहे. एवढी वाहने रस्त्यावर का येतात याचा विचार करायला हवा. सार्वजनिक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे नाइलाजास्तव बहुसंख्य नागरिकांना स्वत:च्या वाहनानेच प्रवास करावा लागतो. रस्तेरुंदीकरणासाठी झाडे तोडून पालिकेला काहीच साध्य होणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरावीक काळात सक्षम करून रस्त्यावरील स्वयंचलित वाहनांची संख्या कमी करणे हाच वाहतूक कोंडीवरील उपाय आहे. पादचाऱ्यांना तसेच सायकल चालवणाऱ्यांना रस्त्यावर पुरेशा सुविधा उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे.’
‘विकास करताना पर्यावरण जपणे महत्त्वाचे’
‘ट्रीज ऑफ पुणे’ आणि ‘पुणे ट्री वॉच’ या संस्थांनीही अशाच प्रकारच्या मागण्या पालिकेसमोर ठेवल्या आहेत. ‘पुणे ट्री वॉच’च्या सदस्य माधवी कोलते म्हणाल्या, ‘सकाळच्या घाईच्या वेळेत गणेशखिंड रस्त्यावर वाहतूककोंडी होते, पण त्यावर झाडे तोडून रस्तारुंदी करणे हे उत्तर नाही. विकास करताना पर्यावरण जपणे गरजेचे असून त्याच पद्धतीने वाहतूककोंडीवर उपाय शोधायला हवा. त्यासाठी जनमताचा रेटा गरजेचा आहे.’ वृक्ष प्राधिकरण समितीचे अमेय जगताप यांनी ही संकल्पना मांडली, असेही त्या म्हणाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2015 रोजी प्रकाशित
गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीला संस्था, निसर्गप्रेमींचा विरोध वाढला
गणेशखिंड रस्त्यावरील झाडे रस्तारुंदीकरणासाठी तोडण्याच्या पालिकेने घेतलेल्या निर्णयाला विविध संस्थांनी आणि निसर्गप्रेमींनी विरोध दर्शवला आहे.
First published on: 09-06-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road widening trees cutting pmc traffic