पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ठप्प असलेली प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा सुरू होणार आहे. प्रवेशासाठीची निवड यादी, प्रतीक्षा यादी कधी जाहीर होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. शिक्षण विभागाने निवडयादी, प्रतीक्षा यादीबाबतची माहिती दिली आहे.

वंचित घटक, सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर खासगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. यंदा शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशांच्या नियमांत बदल केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. परिणामी न्यायालयात याचिका दाखल होऊन प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे जुलै महिना अर्धा होऊनही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशात केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा राज्यातील ९ हजार २०८ शाळांमध्ये १ लाख ८ हजार २१६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख ४३ हजार १०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त असल्याने सोडतीची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे.

हेही वाचा – पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये धुसफूस, श्रीनाथ भिमालेंची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

हेही वाचा – वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पत्ता दिलेल्या कंपनीवर पिंपरीच्या आयकर विभागाची कारवाई, कंपनी केली सील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, की आरटीई प्रवेशांची प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे. त्यानुसार शनिवारी प्रवेशासाठीची निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल. शनिवारपासून पालकांना प्रवेशासाठीचे लघुसंदेश पाठवण्यात येणार आहेत.