शासकीय कामकाजात आधुनिकता आणून नागरिकांना सोप्या यंत्रणेद्वारे वाहन चालविण्याचा परवाना मिळवून देण्यासाठी व दलालांच्या तावडीतून त्यांची सुटका करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ऑनलाइन पद्धत सुरू केली. मात्र, शिकाऊ वाहन परवाना काढल्यानंतर पक्क्य़ा परवान्यासाठी अनेकांना ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ मिळत नसल्याचे वास्तव आहे. पक्क्य़ा परवान्यासाठी चाचणी घेण्याची प्रादेशिक परिवहन कार्यालयाची क्षमता पाहता त्यापेक्षा परवाना मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हा परवाना काढताना नागरिकांच्या अक्षरश: नाकीनऊ येत आहेत. राज्याच्या परिवहन विभागाने याबाबत ठोस तोडगा काढून नागरिकांची फरपट थांबवावी, अशी मागणी होत आहे.
वाहन चालविण्याचा शिकाऊ व पक्का परवाना काढण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी ऑनलाइन पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार परवाना काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर प्रत्यक्ष चाचणीला जाण्यासाठी ऑनलाइन पद्धतीनेच वेळ घ्यावी लागते. उपलब्ध व सोयीची वेळ घेतल्यानंतर त्या दिवशी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन चाचणी द्यावी लागते. वरवर ही पद्धत अत्यंत सुटसुटीत व योग्य असली, तरी या पद्धतीतील त्रुटी आता समोर येत आहेत. त्याबाबत नागरिकांकडून विविध तक्रारी करण्यात येत आहेत.
शिकाऊ परवाना काढल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पक्कय़ा परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. पण, शिकाऊ परवाना काढल्यानंतर एक महिन्यानंतरही पक्क्य़ा परवान्यासाठी अर्ज सादर केल्यास प्रत्यक्ष चाचणीसाठी पुढील पाच महिन्यांची तारीख मिळत नाही. त्यामुळे शिकाऊ परवान्याची सहा महिन्यांची मुदत संपण्याचा धोका असतो व मुदतीनंतर शिकाऊ परवाना बाद होतो. त्यानंतर पुन्हा शिकाऊ परवाना काढणे बंधनकारक असते. त्यामुळे हा सर्व प्रकार नागरिकांसाठी द्राविडी प्राणायम ठरणार आहे. परवान्यासाठी रांगेत असणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ही यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे परिवहन खात्याने तातडीने याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

‘‘वाहन चालविण्याच्या पक्क्य़ा परवान्यासाठी चाचणी घेण्याची क्षमता कमी आहे. अनेक नागरिक सध्या परवाना मिळविण्याच्या रांगेत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक संशोधन संस्थेच्या चाचणी मार्गावर सध्या सर्वच मोटार चालकांची वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात येते. त्याऐवजी या चाचणी मार्गावर केवळ व्यावसायिक वाहन चालविणाऱ्यांची चाचणी घ्यावी व इतर खासगी मोटारी चालविणाऱ्यांची चाचणी आरटीओच्या कार्यालयात घ्यावी, असा प्रस्ताव आम्ही परिवहन खात्याला देणार आहोत.’’
– राजू घाटोळे
अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नापासांचा प्रश्नही अनुत्तरितच
वाहन चालविण्याचा पक्का परवाना काढण्यासाठी सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक संशोधन संस्थेच्या चाचणी मार्गावर परीक्षा घेण्यात येते. ही चाचणी कठीण असल्याने त्यात नापास होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार अशा नापासांची परीक्षा पुढील आठ दिवसांत पुन्हा घेतली जाणे आवश्यक आहे. मात्र, ऑनलाइन पद्धतीत या नापासाला पुन्हा परीक्षेची वेळ मिळवावी लागते. यंत्रणेवरील सध्याचा ताण लक्षात घेता, त्याला ही वेळ मिळत नाही. रविवारी व सुटीच्या दिवशी नापासांची परीक्षा घेण्याचे परिवहन विभागाच्या सूचना आहेत. मात्र, त्यानुसारही परीक्षा होत नाही. त्यामुळे या प्रकारात कायद्याचा भंग केला जात असल्याचा आरोप मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto driving licence exam online appointment
First published on: 23-06-2015 at 03:13 IST