पुणे : चिलीत समुद्रसपाटीपासून सुमारे २७०० मीटर इतक्या उंचावर असलेली रुबिन वेधशाळा… या वेधशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे, एका वेळेला ४० पूर्ण चंद्र टिपण्याची उच्च क्षमता असलेला ३२०० मेगापिक्सेलचा कॅमेरा… खगोलशास्त्राला नवी दिशा देणारी ही वेधशाळा भारतीयांसाठी, महाराष्ट्रासाठी एका वेगळ्या कारणासाठी महत्त्वाची आहे… या वेधशाळेतील अवकाश निरीक्षण करणाऱ्या चमूमध्ये मूळच्या पुण्याच्या डॉ. क्षितिजा केळकर या एकमेव भारतीय शास्त्रज्ञाचा समावेश आहे.

रुबिन वेधशाळा चिलीतील ला सेरेना शहरापासून ६२ किलोमीटर दूर असलेल्या पाचोम नामक डोंगरावर बांधण्यात आली आहे. या ठिकाणाची निवड करण्याचे कारणही महत्त्वाचे. येथील वातावरण अत्यंत कोरडे आहे. त्यामुळे वर्षभरातील सुमारे ३४० रात्री स्वच्छ असतात. परिणामी, कॅमेऱ्याद्वारे टिपल्या गेलेल्या अवकाशाची छायाचित्रे अत्यंत चांगल्या गुणवत्तेची मिळण्याची शक्यता. या वेधशाळेच्या परिसरात आणखीही काही वेधशाळा आहेत. एका अर्थाने, हा परिसर म्हणजे वेधशाळांचा समूह आहे.

डॉ. क्षितिजा सांगतात, ‘आतापर्यंत जगभरात उपलब्ध असलेल्या दुर्बिणींचा वेग कमी आहे. त्यामुळे जगातील सर्वांत वेगवान दुर्बीण असे रुबिन वेधशाळेचे वर्णन करता येईल. या प्रकल्पाला ‘लेगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाइम’ (एलएसएसटी) असेही म्हटले जाते. या वेधशाळेतील कॅमेरा जगातील सर्वांत मोठा आहे. त्याला तीन आरसे जोडलेले आहेत. ‘ऑप्टिकल लाइट’ टिपू शकणाऱ्या या कॅमेऱ्याद्वारे अवकाशाचा सखोल नकाशा तयार करण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. दर आठवड्यात तीन ते चार रात्री या प्रमाणे दहा वर्षे आकाश पाहिले जाणार आहे. म्हणजे, ‘टाइम लॅप्स’ पद्धतीने सतत दहा वर्षे सक्रिय विश्व अर्थात ‘युनिव्हर्स इन अॅक्शन’ टिपायचे आहे. त्यामुळे अवकाशातील लघुग्रह, तारे यांतील बदल, पृथ्वीजवळ येणारे लघुग्रह यांचाही वेध घेतला जाईल. या कॅमेऱ्याची क्षमता तीव्र असल्याने ६० सेकंदांतील हलते घटकही टिपले जातील. त्यातून अनेक नवे घटक उजेडात येतील. ब्रह्मांड, दीर्घिकांचे सखोल, व्यापक चित्र मिळेल. कृष्ण पदार्थ (डार्क मॅटर) म्हणजे नेमके काय, अशा बऱ्याच गोष्टी समजून घेणे, सखोल निरीक्षणे करणे शक्य होणार आहे.’

क्षितिजा यांना बालपणापासूनच विज्ञानाची, विशेषत: खगोलशास्त्राची गोडी लागली. एसपीएम शाळेत शिक्षण घेताना सुरुवातीला ही आवड आकाश निरीक्षणांपुरती होती, तरी दहावीनंतरच्या करिअरचा विचार करताना त्यांनी खगोलशास्त्रात काम करण्याचे ठरवले. फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदवी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली. पुढे नॉटिंगहॅम विद्यापीठातून पीएच.डी.ही प्राप्त केली, तर चिलीतील विद्यापीठातून ‘पोस्ट डॉक’ पूर्ण केले. स्वतंत्रपणे संशोधन सुरू करताना बेंगळुरूतील रमण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी तीन वर्षे काम केले. त्यानंतर आता त्यांना रुबिन वेधशाळेत निरीक्षण विशेषज्ञ (ऑब्झर्व्हिंग स्पेशलिस्ट) म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दीड वर्षापासून त्या तिथे कार्यरत आहेत.

संशोधनाचे स्वरूप काय आहे?

रुबिन वेधशाळेतील संशोधनाबाबत डॉ. क्षितिजा म्हणाल्या, ‘जगातील सर्वांत अद्यायावत असलेल्या या वेधशाळेच्या कॅमेऱ्याद्वारे अवकाश टिपण्यास सुरुवात झाली. या कॅमेऱ्याची क्षमता फार मोठी असल्याने त्याद्वारे मिळणारी छायाचित्रेही अतिशय उच्च दर्जाची आहेत. काही दिवसांपूर्वीच या कॅमेऱ्याद्वारे टिपलेले पहिले छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. त्यातून काही महत्त्वाची माहिती हाती आली. त्यात एक दीर्घिका समूह टिपला गेला. या दीर्घिका समूहातील सुमारे २१०० लघुग्रह शोधण्यात आले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरांवरील भौतिकशास्त्र समजून घेणे शक्य होणार आहे. तसेच, ताऱ्यांच्या निर्मितीची प्रक्रिया, ताऱ्यांचे वितरण, दूरच्या दीर्घिकांचा अभ्यास करता येणार आहे.’

‘रेडिओ खगोलशास्त्र ही भारताची ताकद’

‘रुबिन वेधशाळा प्रकल्प वीस वर्षांपूर्वी सुरू झाला. या प्रकल्पातील सहभागी देशांमध्ये भारताचा समावेश नाही. मात्र, या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली आहे. या वेधशाळेत काम करत असलेली मी एकमेव भारतीय शास्त्रज्ञ आहे. रेडिओ खगोलशास्त्र ही भारताची ताकद आहे. गेल्या तीन दशकांत भारतात उत्तम शास्त्रज्ञ घडले आहेत. स्क्वेअर किलोमीटर अॅरे, ३० मीटर ऑप्टिकल टेलिस्कोप (टीएमटी), एक्स्ट्रीम लार्ज टेलिस्कोप, लायगो अशा प्रकल्पांमध्ये भारताचा सहभाग आहे,’ असेही डॉ. क्षितिजा यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शास्त्रज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय प्रकल्पात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. वेधशाळेत काम करताना वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या लोकांबरोबर काम करण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. अतिशय समृद्ध करणारा असा हा अनुभव आहे. – डॉ. क्षितिजा केळकर, शास्त्रज्ञ