पिंपरी : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या शुक्रवारी सकाळी वाकड येथे वैष्णवीच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आल्या असता, मराठा समाजाने त्यांना घेराव घातला. वैष्णवी आणि मयूरी जगताप-हगवणे यांना न्याय देण्यात महिला आयोग कमी पडल्याचा आरोप करण्यात आला. ‘मी या प्रकरणात स्वत: अर्जदार आहे. पोलिसांना कारवाईचे पत्र देण्यात आले. राजकीय दबाव असता, तर या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली नसती,’ असे चाकणकर यांनी स्पष्ट केले.

चाकणकर या कस्पटे कुटुंबीयाच्या भेटीसाठी शुक्रवारी वाकड येथे आल्या होत्या. कुटुंबीयाची भेट घेतल्यानंतर त्या जाण्याच्या तयारीत असताना मराठा सेवा संघ, स्वराज्य संघटना, छावा, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी त्यांना घेराव घातला. ‘घटनात्मक पदावर असताना तुम्ही भूमिका मांडत नाही. पदाच्या ‘प्रोटोकॉल’मधून बाहेर पडा’ असे स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव म्हणाले.

चाकणकर म्हणाल्या, ‘मी या प्रकरणात स्वत: अर्जदार आहे. पोलिसांना कारवाईचे पत्र दिले होते. राजकीय दबाव असता तर ‘स्युओमोटो’ केले नसते. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मयूरी हगवणे हिच्या भावाने आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेऊन दुसऱ्या दिवशी कारवाई करण्याबाबत पोलिसांना सांगितले होते. गुन्हा दाखल करणे आणि तपास करणे हे पोलिसांचे काम आहे. आयोगाने सांगितल्यावर २४ तासांंच्या आत गुन्हा दाखल झाला.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आरोपींवर आरोपपत्र आतापर्यंत दाखल होणे अपेक्षित होते. ते झाले नाही. अशा प्रकरणात वेळेत आरोपपत्र दाखल होऊन न्यायालयात त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी विनंती राज्याच्या गृहमंत्र्यांना करणार आहे,’ असेही त्या म्हणाल्या.