रुपी को. ऑपरेटिव्ह बँक १ नोव्हेंबरपासून अवसायनात काढण्यात आली आहे. अवसायक म्हणून सहकार आयुक्तांनी धनंजय डोईफोडे यांची नियुक्ती केली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. ठेव विमा महामंडळाकडून (डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरन्टी कॉर्पोरेशन – डीआयसीजीसी) बँकेच्या ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतच्या ठेवींची रक्कम परत करण्यास येत आहे. याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत ठेवीदार, खातेदारांनी अर्ज करावेत. त्यानंतर ठेवीदारांना रक्कम मिळण्यास अडचणी आल्यास बँक जबाबदार राहणार नसल्याचे बँकेच्या वतीने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.
अवसायनाच्या प्रक्रियेनुसार ठेव विमा महामंडळाकडून ज्या ठेवीदारांना यापूर्वी बँकेकडून पाच लाखांपर्यंतची विमा संरक्षित ठेवरक्कम मिळालेली नाही, अशा ठेवीदारांना त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या ठेव रकमा परत करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच बँकेच्या वतीने यापूर्वी १७ नोव्हेंबर प्रसृत करण्यात आलेल्या निवदेनानुसार १५ डिसेंबरपर्यंत ठेवीदार, खातेदारांनी आपले अर्ज आणि संबंधित ग्राहक पडताळणी प्रक्रिया (केवायसी) कागदपत्रे सादर करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, अद्यापही ज्या ठेवीदार, खातेदारांनी त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज केले नसतील, त्यांनी संबंधित शाखेशी संपर्क करावा. ठेवीदारांनी आवश्यक सर्व पूर्तता करून योग्य त्या कागदपत्रांसह बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये त्यांचे अर्ज ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावेत. त्यानंतर ठेवींची रक्कम मिळण्यास अडचणी आल्यास त्याला रुपी बँक जबाबदार राहणार नाही, असे अवसायक धनंजय डोईफोडे यांनी स्पष्ट केले.