बदलत्या हवेप्रमाणे धोरणही बदलत सरकारचे गुणगान करण्याच्या प्रवृत्तीमुळे पत्रकारितेचा आवाज क्षीण होत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी वास्तवावर बोट ठेवले.
‘सरहद’ संस्थेतर्फे घुमान येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. अशोक कामत, डॉ. सदानंद मोरे आणि भारत सासणे यांच्या हस्ते कुलदीप नय्यर यांना ‘संत नामदेव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भारती नय्यर, घुमानचे सरपंच हरबन्ससिंग, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संतसिंग मोखा, चरणजितसिंग सहानी, हरिवदरसिंग घई, स्वागताध्यक्ष भारत देसडला आणि ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार या वेळी व्यासपीठावर होते.
सध्या सगळीच वृत्तपत्रे एकाच स्वरूपाची दिसतात, अशी टिप्पणी करून कुलदीप नय्यर म्हणाले, की सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी सरकारचे गुणगान करण्यामध्ये पत्रकारिता मश्गुल होताना दिसत आहे. सरकारच्या दोषांवर प्रकाश टाकणे ही जनतेची आपल्याकडून अपेक्षा असते. त्यासाठी पत्रकारितेने ‘जागल्या’ म्हणून काम केले पाहिजे. हिंदूुस्थानामध्ये हिंदूू बहुसंख्य असले तरी हे घटनेनुसार काम करणारे राष्ट्र आहे. त्यामुळे अल्पसंख्य समाजाच्या हक्कांची पायमल्ली होत असेल तर, त्याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे. आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्निबध लादले गेले होते, तेव्हा इंदिरा गांधी यांना विरोध करून तुरुंगात गेलो होतो. सध्या देशात हिंदूुत्वाची हवा आहे. ‘कोई छा जाता है तब प्रेसभी झुक जाती है’, या शब्दांत त्यांनी वास्तव मांडले.
कुलदीप नय्यर यांना सन्मानित केल्याने आपलाच गौरव झाला असल्याची भावना डॉ. अशोक कामत, डॉ. सदानंद मोरे आणि भारत सासणे यांनी व्यक्त केली. कुवळेकर यांनी मनोगतातून नय्यर यांच्या पत्रकारितेची वैशिष्टय़े उलगडली. संजय नहार यांनी स्वागत केले. भारत देसडला यांनी प्रास्ताविक केले. संतसिंग मोखा यांनी आभार मानले.

राज्याच्या प्रगतीमध्ये पंजाबींचे योगदान
पंजाबी असल्याचा अभिमान वाटतो, असे सांगून कुलदीप नय्यर म्हणाले,की पुण्यामध्ये ११ गुरुद्वारा आहेत. तर, येथील ४० हजार छोटे-मोठे उद्योग पंजाबी समाजाच्या ताब्यात आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये पंजाबी समाज आपले योगदान देत आहे.