स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा बहुचर्चित आणि रेंगाळलेला विषय अखेर मार्गी लागला आहे. गेली आठ वर्षे रखडलेले स्मारकाचे काम आता पूर्ण झाले असून या स्मारकामुळे महात्मा फुले वाडा आणि समताभूमीच्या वैभवात भर पडणार आहे.
गंज पेठ, टिंबर मार्केट येथे महापालिकेचे मुख्य अग्निशामक दल कार्यालय आहे. याच परिसरात महात्मा फुले वाडय़ाची ऐतिहासिक वास्तू महापालिकेने जतन केली असून या वाडय़ाच्या जवळ आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. गंज पेठ प्लॉट क्रमांक २३१ ही जागा महापालिकेच्या मालकीची असून तेथे पालिका कोठीचे आरक्षण होते. ते आरक्षण बदलून ती जागा निवासी विभागात समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत बराच कालावधी गेला. अखेर शासनाने आरक्षण बदलाला मान्यता दिल्यानंतर हे काम सुरू झाले. मात्र, त्यातही वेळोवेळी अडचणी येत होत्या. अखेर आठ वर्षांनंतर ही स्मारकाची वास्तू उभी राहिली असून तिचा उद्घाटन समारंभ शनिवारी (२ ऑगस्ट) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत होत आहे.
सावित्रीबाई फुले स्मारकासाठी साठ हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील बत्तीसशे चौरस फूट जागेवर बांधकाम करण्यात आले आहे. त्यात ग्रंथालय, तसेच पाचशे तीस आसनक्षमतेचे भव्य प्रेक्षागृह, माता बालसंगोपन केंद्र, व्यायामशाळा यासह प्रशिक्षण केंद्र व आनुषंगिक कार्यालये यांचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच स्त्री शिक्षणासाठी सावित्राबाईंनी जे कार्य केले, ते समूहशिल्पाच्या माध्यमातून या स्मारकात साकारण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागातर्फे महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातील. महिलांना संगणक प्रशिक्षण तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि महिलांसाठीच्या योजना राबवण्यासाठी या वास्तूचा उपयोग करून घेतला जाणार आहे.
महापौर चंचला कोद्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samata bhoomi savitribai phule pmc
First published on: 01-08-2014 at 03:25 IST