महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी सनातनच्या आणखी एका साधकाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) शुक्रवारी चौकशी करण्यात आली. तो साधक मूळचा मुंबईचा असल्याचे समजते.
डॉ. दाभोलकर खूनप्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक करण्यात आल्यानंतर सीबीआयने सनातनच्या साधकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. सीबीआयने सनातनच्या एका साधकाला चौकशीसाठी मुंबई येथील कार्यालयात शुक्रवारी बोलाविले होते. त्याची चौकशी सुरू असून तावडे याच्या अटकेनंतर आणखी काहीजणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, चौकशीत अद्याप काही निष्पन्न झाले नाही. तावडे याच्या अटकेनंतर अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तावडे आणि गोव्यातील मडगाव बाँबस्फोटातील फरारी आरोपी सारंग अकोलकर यांच्यात झालेल्या ई-मेल संभाषणात सातजणांचा उल्लेख आढळून आला आहे. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणाचा तावडे मुख्य सूत्रधार असल्याचा संशय सीबीआयला आहे. तावडे याने मारेक ऱ्यांच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांचा खून घडविला. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा कट २००९ मध्ये रचण्यात आला होता. २००४ मध्ये कोल्हापुरात झालेल्या एका सभेत तावडे याने डॉ. दाभोलकर यांना मारण्याची धमकी दिली होती. त्याअनुषंगाने सीबीआयने कोल्हापुरातील एकाचा जबाबदेखील नोंदवून घेतला होता. तावडे सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे.
डॉ. दाभोलकर खूनप्रकरणात सहा संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. तावडे याची सीबीआयकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. तावडे सीबीआयला तपासात सहकार्य करत नसल्याने त्याची सत्यशोधण चाचणी (लाय डिटेक्टर) करण्यात येणार आहे. या संदर्भात सीबीआयकडून न्यायालयाला विनंती अर्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वीरेंद्र तावडेने १५ हजारांची सशस्त्र सेना उभारण्याचे प्रयत्न केल्याचा सीबीआयचा दावा
नवी दिल्ली: नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने हिंदूविरोधी शक्तींशी लढण्याकरिता १५ हजार सशस्त्र लोकांची सेना उभारण्याचे प्रयत्न केले होते, असा दावा सीबीआयने शुक्रवारी केला. या खुनाच्या संदर्भात अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा सदस्य वीरेंद्र तावडे याने सारंग अकोलकर याला ई-मेल्स पाठवले होते. शस्त्रसज्ज असलेल्या आणि देशातील हिंदूविरोधी शक्तींशी लढण्यास तयार असलेल्या १५ हजार लोकांची सेना उभारण्याचा त्याने यात उल्लेख केला होता. यासाठी देणग्यांच्या माध्यमातून पैसा गोळा करावा आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी तो कमी पडल्यास लुटालूट करावी, असेही त्याने अकोलकर याला सुचवले होते असा दावा करण्यात आला आहे.