जेजुरी : पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी जिल्हाध्यक्षपदाचा आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.
जगताप यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवला असून, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडे राजीनामा पत्र दिले आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे जगताप यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघात २००९ आणि २०१४ या सलग दोन निवडणुकांमध्ये विजय शिवतारे निवडून आले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत संजय जगताप यांंनी त्यांचा पराभव केला.
२०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली. झेेंडे यांनी ४७ हजार मते घेतल्याने मतांच्या विभाजनाचा फटका जगताप यांना बसला. शिवसेनेेचे (शिंदे) शिवतारे विजयी झाले. तेव्हापासून जगताप नाराज होते. ते काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती.