यंदा अन्नदानाऐवजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पिंपरी : संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने आषाढी वारीदरम्यान लाखभर भाविकांसाठी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून अन्नदान सोहळा आयोजित करणाऱ्या देहूगावातील संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाचा तीन दिवसीय अन्नदान सोहळा यंदा सलग दुसऱ्या वर्षी करोनामुळे खंडित झाला आहे. गेल्या वर्षी करोनाविषयक मदतकार्यात योगदान देणाऱ्या मंडळाच्या वतीने यंदा अन्नदानाऐवजी पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तोंडावर अन्नदान करण्याची मंडळाची  १९९४ पासूनची परंपरा आहे. सुरुवातीला १५० भाविकांना प्रसाद देऊन सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती २०१९ मध्ये लाखभराहून अधिक भाविकांपर्यंत पोहोचली. पहिल्या दिवशी पिठलं भात, दुसऱ्या दिवशी सांबर भात आणि तिसऱ्या दिवशी महाप्रसाद म्हणून दिले जाते. देहूलगतच्या अनेक गावांमधील शेकडो नागरिक यात सक्रिय सहभाग नोंदवतात, हे या सोहळ्याचे वैशिष्टय़ मानले जाते.

या अन्नदानासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, खेड, हवेली, मुळशी तालुक्यातील अनेकांनी दातृत्व स्वीकारत मदतीचा हात दिला आहे. अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेला अन्नदान सोहळा गेल्या वर्षी करोनामुळे रद्द करावा लागला. तेव्हा महाप्रसादासाठी जमलेली रक्कम करोनाच्या विविध मदतकार्यासाठी वापरण्यात आली. यावर्षी पंचक्रोशीतील अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. अन्नदानाच्या उपक्रमात सलग दुसऱ्या वर्षी खंड पडल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात रूखरूख असल्याचे सांगण्यात आले.

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात येते. लाखो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. करोनाच्या संकटामुळे यंदा दुसऱ्या वर्षीही अन्नदानाचे सेवाकार्य होऊ शकणार नाही. यंदा मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

– सुनील कंद, संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ, देहूगाव