पुणे : ग्रामीण भागातील मुलांच्या शाळांपर्यंत प्रयोगशाळा घेऊन जाणारी पुण्यातील ‘विज्ञानवाहिनी’ ही संस्था कार्यविस्तारासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहे. प्रयोगशाळांसाठी लागणारी उपकरणे, बसची देखभाल-दुरुस्ती इत्यादी कामांसाठी संस्थेला मदतीची आवश्यकता आहे.
जिथे विज्ञानाचे प्रयोग करण्याची किंवा बघण्याची सोय नाही, अशा ठिकाणी जाऊन मुलांना प्रयोग दाखवून, त्याची शास्त्रशुद्ध माहिती देऊन विज्ञानाची ओढ निर्माण करण्याचा संकल्प या संस्थेने केला आहे. अमेरिकेतील गणिताचे निवृत्त प्राध्यापक डॉ. मधुकर आणि पुष्पा देशपांडे या दाम्पत्याने संस्थेची स्थापना केली. त्यांनी १९९५ पुण्यात स्वखर्चाने एक बस बनवून घेतली. बसमध्ये बसण्यासाठी सहा जागा आणि रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या प्रयोगासाठीचे साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.
रोजचा शंभर-सव्वाशे किलोमीटरचा प्रवास करून भोर, पुरंदर, वेल्हे, मावळ, खेड, शिरूर, आंबेगाव या तालुक्यातील शाळांमध्ये संस्थेची फिरती प्रयोगशाळा जाते. संस्थेचे विज्ञान संवादक इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग करून दाखवतात. त्यांच्याकडून ते करूनही घेतात. सध्या संस्थेत २२ संवादक विनामूल्य काम करत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
संस्थेच्या फिरत्या प्रयोगशाळेने आतापर्यंत ४ लाख ६६ हजार ५२८ किलोमीटरचा प्रवास करून सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगांचे धडे दिले आहेत. तसेच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर दोन वर्षांनी पुण्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्यात विविध विषयांवरील चर्चासत्रांबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञान विषयात संशोधन, अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या नामवंत संस्थांना भेट दिली जाते.
संस्थेतील संवादक मानधन घेत नाहीत. शाळांना शुल्क आकारले जात नाही. प्रयोगांसाठी लागणारी उपकरणे, साहित्याबरोबर चालकाचा पगार, इंधन शुल्क, देखभाल-दुरुस्ती खर्च यांचा खर्च भागवण्याची कसरत संस्थेला करावी लागते आहे. अपुरी साधने आणि तोकडा निधी संस्थेसमोर अनेक आव्हाने घेऊन आला आहे. – दत्तात्रय देवल, विज्ञानवाहिनी